Monday, December 23, 2024
Homeराज्यछ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी, महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार...

छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी, महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार…

अमरावती/मुंबई दि. २४ फेब्रुवारी २०२३ – घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विजेता जाहीर केले असून नवी दिल्ली येथे आज (शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या कोलकतास्थित संस्थेची स्थापना १९२५ साली उद्योगपती जी. डी. बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशातील अनेक प्रतिष्ठित व मोठे उद्योगसमूह चेंबरचे सदस्य आहेत. चेंबरने शुक्रवारी नवी दिल्ली येथे हरित ऊर्जेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित शिखर परिषदेत हरित ऊर्जा क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वर्गवारीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माजी केंद्रीय ऊर्जा सचिव श्री अनिल राजदान व ईआरइडाएचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री के. एस.पोपली यांच्याहस्ते महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री चंद्रमणी मिश्रा यांनी ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणतर्फ़े पुरस्कार स्विकारला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.

घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची अशी ‘रूफटॉप सोलर’, योजना आहे. या योजनेला महावितरणच्या ग्राहकांची पसंती मिळाली आहे. राज्यात दि. २२ फेब्रुवारी रोजी रूफ टॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या ७९,५६४ झाली होती व त्यांच्याकडून १३८७ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली गेली होती.

राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६ -१७ या आर्थिक वर्षात घरगुती रूफ टॉपचे केवळ १,०७४ ग्राहक होते व २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता होती. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे व १,३८७ मेगावॅटची क्षमता गाठली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ नंतर आतापर्यंत ३५६ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची भर पडली आहे.

सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे वीजबिलात बचत होण्यासोबत पर्यावरण रक्षणाला मदत होते.

घरगुती ग्राहकांप्रमाणे औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: