आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे एका अविवाहित तरुणाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणात एकाच परिवारातील दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. मृतकाचे भावाच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी पाचही आरोपींवर रितसर गुन्हे दाखल केले आहेत. मोटरसायकलचा धक्का लागून कलागत झाल्याचे ह्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले असले तरी वास्तवात मात्र या हत्येमागे वेगळेच कारण असल्याची गावभरात कुजबूज आहे.
मृतक देवानंद उत्तम तायडे याचा भाऊ अनिल उत्तम तायडे ह्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आणि हिवरखेड ठाणेदार गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय मृतक देवानंद हा दानापूर येथील पाण्याचे टाकीजवळ राहतो. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात ते आठ वाजता चे सुमारास तो दानापूर माळेगाव रस्त्याने मोटरसायकलने जात असता तेथील झोपडपट्टी जवळ उभ्या असलेल्या लोकांना त्याचे मोटरसायकलचा धक्का लागला. त्यावरून वाद निर्माण झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. धक्का लागलेल्या पाचही जणांनी देवानंद ह्याचेवर काठ्या व राफ्टरने हल्ला चढविला. त्यात देवानंद गंभीर जखमी झाला.
ते पाहताच पाचही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची खबर मिळताच हिवरखेड पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले. पोलीस आल्यावर देवानंदचे वडिलांनी त्याला अकोला येथे सर्वोचार रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. त्यामुळे प्रयत्नांची शर्थ करूनही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान हिवरखेड ठाणेदार गोविंद पांडव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल पवार, निलेश खंडारे, बीट जमादार श्रीकृष्ण सोळंके यांनी फरार आरोपींच्या शोधार्थ दानापूर परिसर पिंजून काढला.
या शोध मोहिमेला यश येऊन पोलिसांनी पाचही आरोपींना चतुर्भुज केले. हे पाचही आरोपी एकाच परिवारातील असून त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. सिद्धार्थ आनंदा वाकोडे, कैलास भास्कर सावळे, आनंदा श्रावण वाकोडे, आशाबाई आनंदा वाकोडे, रमाबाई कैलास सावळे अशी त्यांची नावे आहेत. सिद्धार्थ वाकोडे हा आनंदा वाकोडे यांचा मुलगा असून आशाबाई वाकोडे ही त्याची आई आणि रमाबाई सावळे ही त्याची बहीण तर कैलास सावळे हे त्याचे जावई आहेत. या पाचही लोकांना अटक करण्यात आली असून त्यांचेवर भादवी कलम ३०२, १४३, १४५, १४७, १४८,१४९ व ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादीमध्ये वाहनाचा धक्का लागला असे कारण दिले असले तरी वास्तवात या हपत्येमागे वेगळेच कारण असल्याचे बोलले जात आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ वाकोडे हा विवाहित आहे. परंतु पत्नीशी वाद झाल्याने तो आपल्या दोन अपत्यांसह आपले पत्नीपासून विभक्त होऊन त्याचे आई-वडिलां जवळ राहत आहे. त्याचे दोन लहान भावांचा अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे. अशातच पतीपासून विभक्त झालेल्या गावातीलच एका महिलेशी त्याचे सूत जुळले. त्यात देवानंदचाही समावेश झाला. त्यामुळे साहजिकच एक म्यान मे तो तलवारे अशी स्थिती बनली.
त्यामुळे दोघेही मनातून एकमेकांविषयी आकस धरून होते. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी दोघांमध्ये दानापूर ग्रामपंचायत जवळ वाद झाला. तो सोडविल्यावर त्या दोघांचा पुन्हा आठवडी बाजारात वाद झाला. तो सोडविल्यावर सिद्धार्थ घराकडे गेला व देवानंद दानापूर माळेगाव रस्त्याने असलेल्या झोपडपट्टीकडे गेला. त्याच झोपडपट्टी जवळ मोटरसायकलचा धक्का लागल्याचे या संदर्भातील फिर्यादीत म्हटले आहे. त्याच ठिकाणी सिद्धार्थ वाकोडे, त्याचे वडील आनंद वाकोडे, आई आशाबाई वाकोडे, बहीण रमाबाई सावळे व जावई कैलास सावळे यांनी देवानंद वर हल्ला चढविला. ज्यात त्याचा मृत्यू ओढवला.
दानापूर ग्रामस्थांच्या बोलण्यातून हत्येची ही पार्श्वभूमी ऐकावयास मिळत आहे. हल्ला करणारे आणि मृतक हे दोन्ही बाजूचे लोक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांचे बाबतीत भलत्याच कारणाने भलततेच काही घडल्याने दानापुरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.