अंधेरी पोटनिवडणुक : मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत अचानक भाजपाने माघार घेतल्याने राज्यात राजकीय चर्चेला उधान आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावर एकनाथ शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहले होते, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर आज अखेर भाजपाने निवडणूक न लढवण्याचं जाहीर केलं. दरम्यान भाजपाने निर्णय जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून किशोरी पेडणेकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, भाजपाने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा टोला यांनी लगावला आहे. भाजपाने आडमुठेपणा केला अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. आजच पत्र का दिलं? एक महिनाआधी का दिलं नाही? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास झाल तो कसा भरुन काढणार? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
“आमचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार याचा आनंद आहे. पण भाजपाने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. लटकेंना ज्याप्रकारे राजीनामा देताना लटकवण्यात आलं होतं, ते लोक विसरु शकत नव्हते,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
“आमच्या पक्षप्रमुखांनी कायमच आपली परंपरा, संस्कृती आम्ही पाळत आलो असल्याचं सांगितलं आहे. दिवंगत व्यक्तीच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी कोणीही असलं तरी आपण त्यास मार्ग मोकळा करुन देतो. पण यावेळी भाजपाने फार आडमुठेपणा केला. काळजाववर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुरजी पटेल हे खोटं प्रमाणपत्र दिल्याने बाद झालेले उमेदवार होते. त्यामुळे सर्वांना ती कल्पना आली. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.