बुलढाणा : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या बुलढाणा जिल्ह्यातून जात आहे. काल या यात्रेदरम्यान विचित्र प्रकार समोर आला आहे. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 733 शेतकऱ्यांना श्रद्धांजली देताना काही समाजकंटकांनी फटाके फोडल्याने राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. यावेळी मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळाचे सत्यपाल महाराज यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या बुलढाण्यात आहे. यावेळी येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेदरम्यान, कृषी कायद्यांना विरोध करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी मंचावर उभे राहिले होते. मात्र एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे शांतपणे उभे राहिलेले असताना दुसरीकडे सभेपासून काही अंतरावर फटाके फोडण्यात आले. अज्ञात व्यक्तींच्या या कृतीमुळे काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना दुसरीकडे काही अंतरावर फटाके फोडले जात होते. फटाक्यांचा आवाज येत होता. यालाच राहुल गांधी यांनी आक्षेप घेत काँग्रेसच्या अन्य नेत्यांना फटाके वाजवणे थांबवावे असे आवाहन करण्यास सांगितले. मात्र तरीदेखील फटाके वाजतच राहिले. त्यानंतर काँग्रेसने या घटनेचे तीव्र निषेध केला. तसेच फटाके फोडण्याचे खोडसाळ काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली.