आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी अन्यत्र देण्यास प्रचंड विरोध दर्शवित लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांचे नेतृत्वात वान धरण येथे गत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाची राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दखल घेऊन या प्रश्नावर ३० मे पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने या आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता तेल्हारा व हिवरखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. परंतु या आंदोलनाला राजकीय स्टंट संबोधणारे आमदार भारसाखळे यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. आकोट तेल्हारा तालुक्यातील शेतकरी व नागरिक यांना सुजलाम सुफलाम करण्याचे दृष्टीने तत्कालीन आमदार सुधाकरराव गणगणे यांनी वारी भैरवगड येथे वान धरणाची निर्मिती केली. आज रोजी आकोट, तेल्हारा, अकोला या तालुक्यांसह बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव येथील नागरिकांचीही तहान हे धरण भागवीत आहे.
सद्यस्थिती ही असली तरी खुद्द तेल्हारा तालुक्यातील निम्मी गावे अद्यापही या पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत. त्यात आता अन्य तालुकेही या पाण्याकडे तहानलेल्या नजरेने रोखून बघत आहेत. मात्र त्या तालुक्यांमध्ये स्वतंत्र जलस्त्रोतांची निर्मिती करणे शक्य असल्यावरही शासन स्तरावर हे पाणी अन्यत्र देण्याचा घाट घातल्या जात आहे. त्याने पाण्याची मालकी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील नागरिक व शेतकरी नागविला जाण्याची पूर्ण शक्यता आहे.
भविष्यातील या धोक्याची पूर्ण कल्पना आल्याने लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी आपले पाणी अन्यत्र जाऊ न देणेकरिता जन आंदोलन उभे केले. त्याकरिता गत २० एप्रिल पासून वान धरणाचे ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला सर्वच स्तरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे या आंदोलनाचे तीव्र पडसादही उमटले. हिवरखेड आणि तेल्हारा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
यासंदर्भात वृत्ते प्रकाशित झाल्यावर या आंदोलनाचे गांभीर्य अखेर राज्य शासनाचे ध्यानात आले. त्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नावर येत्या ३० मे च्या आत तोडगा काढण्याची हमी दिली आहे. त्यांचेकरवी प्रशासनाने तशा आशयाचे पत्र आंदोलनाचे प्रणेते अनिल गावंडे यांचे सुपूर्द केले. त्यामुळे त्यांनी ३० मे पर्यंत हे आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु या साऱ्या आंदोलनाची राजकीय स्टंट म्हणून खिल्ली उडविणाऱ्या आमदार भारसाखळे यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. वास्तविक आपल्या मतदारसंघातील रयतेच्या समस्या सोडविणे हे आमदाराचे आद्य कर्तव्य असते. त्याचीच जाण ठेवून अकोला, खामगाव येथील लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर पाठपुरावा करून वानचे पाणी आपल्याकडे खेचून नेले. ते पाहू जाता आमदार भारसाखळे यांनीही आपला मतदार तहानलेला राहणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे होते.
या आंदोलनाला समर्थन देणे अगत्याचे होते. मात्र तसे न करता उलट त्यांनी या आंदोलनाला राजकीय स्टंट संबोधून आपण नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता नव्हे तर केवळ त्यांचे जोरावर आमदारकी उपभोगण्याकरिता आहोत या हिन प्रवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या या भूमिकेची तेल्हारा तालुक्यात मोठी निर्भत्सना होत आहे. “बाहेरून आलेला माणूस मूळ निवासीयांचे हित कधीच पाहू शकत नाही” अशी भावना त्यांचेबाबत नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.
या आंदोलनाला भारसाखळे यांनी राजकीय स्टंट म्हणून संबोधले असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हा राजकीय स्टंट नसून जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे दिसून आले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या कृतीने आमदार भारसाखळे यांना मोठीच चपराक बसली आहे.