शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे भोवले…
रामटेक – राजू कापसे
सरपंच पदावर आरूढ असताना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे तालुक्यातील देवलापार ग्रामपंचायत च्या महिला सरपंचांना चांगलेच भोवलेले आहे. या त्यांच्या कृत्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्यांना सरपंच पदावरून अपात्र ठरल्याचे आदेश दिलेले आहे.
सविस्तर वृत्तानुसार तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत देवलापार येथे सरपंच पदावर आरूढ असलेल्या शाहिस्ता इलियाज पठाण या सरपंचांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवलेले आहे. याबाबद अर्जदार विनोद मसराम राहणार झिंजेरिया पोस्ट देवलापार यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केलेला होता. माहितीनुसार सरपंच शाहिस्ता पठाण यांचे पती इलीयाज पठाण यांनी आपल्या दुकानाच्या समोरील जागेवर अतिक्रमण केलेले होते.
विशेष म्हणजे तसे त्यांनी कबूल सुद्धा केलेले होते. तेव्हा अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंचांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1959 चे कलम 14 ( ज ३ ) व 16 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतच्या सदस्य तथा सरपंच पदावर राहता येत नाही. दरम्यान अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या विरोधात गैरअर्जदार शाहिस्ता पठाण यांना सुद्धा आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली होती. तेव्हा त्यांनी सुद्धा यावेळी आपले मत मांडले.
मात्र एकंदरीत सर्व बाबी लक्षात घेता व अधिनियमातील तरतुदीनुसार गैर अर्जदार हे दोष सिद्ध पात्र असल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी विजया बनकर यांनी अर्जदाराचा अर्ज मंजूर करीत गैर अर्जदार क्रमांक १ शाहिस्ता इलीयाज पठाण सरपंच ग्रामपंचायत देवलापार तहसील रामटेक यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1959 चे कलम 14 ( ज ३ ) व 16 मधील तरतुदीनुसार सरपंच / सदस्य पदाकरिता अपात्र करीत असल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.