इंडियन पँथर सेनेचे जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षकांना निवेदन…
नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यात अवैध ओव्हरलोड रेती वाहतुकीस अर्थपूर्ण मुखसंमती देऊन सगरोळी व हीप्परगा येथील दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एसडीएम सचिन गिरी व तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तत्काळ नोंदवून त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करणे अन्यथा दिनांक 7/6/2024 पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणचा इशारा इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून गरजू लोकांना वाळु उपलब्ध करून देण्याचे कारण देत बेसुमार वाळु उपसा करून मौजे सगरोळी येथील डेपो क्रमांक 2 मधून क्षमतेपेक्षा जास्त वाळु भरून नेणाऱ्या ओव्हरलोड हायवा चालकाचे नियंत्रण सुटल्याने सगरोळीहून देगलुरकडे 26 मे रोजी सकाळी 10 वाजता जात असताना एम. एच 04 एफ जे 9709 या हायवाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने मयत नवीन पवार रा. सगरोळी ता. बिलोली व मयत मोईन शेख रा. हीप्परगा ता. बिलोली या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ओव्हर लोड वाहतुकीस आर्थिक हित संबधातून उपविभागीय अधिकारी श्री. गिरी, व तहसीलदार श्री. निळे यांनी वाळु माफिया व ठेकेदारांना वारंवार पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. या बाबत अनेक वेळा निवेदन व लेखी तक्रार देवून सुद्धा कसल्याच पद्धतीची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, परिणामी दोन निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यास पूर्णतः जबाबदार हे प्रस्तुत अधिकारी असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ सेवेतून कार्यमुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे त्वरित सादर करावा.
तसेच या दोन्ही अधिकार्यांनी अवैध रेती वाहतुकीस मुख संमती देऊन करोडो रुपयांची महामाया जमा केली यात मुळीच शंका नाही त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संपत्तीची कसुन चौकशी करून दोषारोप सिद्ध होताच त्यांची जंगम संपत्ती ही जप्त करण्यात यावी. व मयतांच्या कुटुंबास प्रत्येकी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी.अशी मागणी दुगाने यांनी केली आहे तत्काळ मागणी मान्य नाही झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, महसूलमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, व आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आले आहे.
या गंभीर बाबीची दखल घेऊन कर्तव्यदक्ष असणारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी व तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मयत कुटुंबाला न्याय मिळवून देणार का? याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.