Monday, December 23, 2024
Homeराज्यराहुलजी गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली – नाना पटोले...

राहुलजी गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली – नाना पटोले…

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’.

महात्मा गांधींना रावण प्रतिमेत दाखवणाऱ्या खलनायकी प्रवृत्तींकडूनच राहुलजी गांधींचीही बदनामी.

भाजपाच्या रावणप्रवृत्तीविरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर निषेध आंदोलन.

मुंबई – हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुलजी गांधी मात्र संविधान, लोकशाही व देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी भाजपाच्या हुकूमशाही व्यवस्थे विरोधात जनतेत जागृती व विश्वास निर्माण केला. राहुलजींची वाढती लोकप्रियता पाहून घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली आहे पण राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

भाजपाच्या रावणप्रवृत्तीविरोधात काँग्रेसकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. मुंबईत चेंबूर रेल्वे स्टेशन जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी CWC सदस्य व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, १९४५ मध्ये ‘अग्रणी’ या मराठी वृत्तपत्रात महात्मा गांधींना रावणाच्या प्रतिमेत दाखवून भाजपा व संघाच्या लोकांनी त्यांची बदनामी केली होती आता त्याच प्रवृत्तींनी इतिहासाची पुनरावृत्ती करत राहुलजी गांधी यांना रावणाच्या प्रतिमेत दाखवून त्यांची बदनामी केली आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा देशाच्या रक्षणासाठी गांधीच पुढे येतात.

या देशाला गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले व राष्ट्र म्हणून उभेही केले आहे. रावणप्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यात काडीचाही संबंध नाही. आज राहुलजी गांधी यांची जनतेत लोकप्रियता प्रचंड वाढली आहे, ते जनतेचे नायक आहेत म्हणनूच भाजपाची खलनायकी प्रवृत्ती त्यांच्याविरोधात सातत्याने कारस्थाने करत आहे.

भाजपाने राहुलजींची बदनामी केल्याचा संताप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तर आहेच पण सर्वसामान्य जनतेमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महात्मा गांधीजी यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार काँग्रेस पक्षाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे पण भाजपाने अति केले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जनतेत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. भाजपाचा सर्व ठिकाणी पराभव होत आहे, त्यांच्या डिपॉझिट जप्त होत आहेत म्हणून घाबरलेला भाजपा राहुलजी गांधी यांची बदनामी करण्याचे काम करत आहे.

भाजपा व संघ गांधी परिवाराची सातत्याने बदनामी करत आला आहे. देशाची एकता व अखंडता टिकून रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांनी बलिदान दिले. रावणप्रवृत्ती या देशात कोणाकडे आहे हे सर्वांना माहित आहे.

हुकूमशाही म्हणजे रावणप्रवृत्ती, देशाची एकता व अखंडता तोडण्याचे काम म्हणजे रावणप्रवृत्ती आहे. काँग्रेस पक्ष भाजपाचा हीन कृतीचा जाहीर निषेध करत असून असले प्रकार काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असेही नसीम खान म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: