साजाचे तलाठी किशोर राऊत दहा दिवसापासून दारूच्या नशेत पोचत आहेत कार्यालयात आज दारुडा तलाठी सही करता- करता जमिनीवर कोसळल्याने शेतकऱ्यांनीच बाजूच्या कक्षातील बेडवर झोपविले.
या दारुड्या तलाठ्याची तातडीने बदली करण्याची होत आहे मागणी
जिल्ह्यातील नावापूरती असलेली दारूबंदी व तिची भयावहता आली पुढे
गडचिरोली – दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्यावर असताना कर्मचारी दारू ढोसून राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कुरखेडा तालुक्यातील साजा क्रमांक आठ सोनेरांगी येथील तलाठी कार्यालय येथील तलाठी किशोर राऊत हे गेल्या दहा दिवसापासून दारूच्या नशेत तलाठी कार्यालयास हजर राहतात.
नशेत असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्यांना वेळेवर लागणारे दाखले व शेतीविषयक कामे होत नसल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होत आहे. या संबंधात मंडळ अधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे. आज काही शेतकरी शेतीविषयक कामांसाठी गेले असता राऊत हे दारूच्या नशेत होते व त्यांना सही करण्याची सुद्धा शुद्ध नव्हती.
सही करता- करता राऊत हे जमिनीवर कोसळले. साजा अंतर्गत येणाऱ्या काही शेतकऱ्यांनी त्यांना उचलले व बाजूच्या खोलीत नेऊन खाटेवर झोपविले.
गडचिरोली जिल्ह्यात नावापूरती दारूबंदी असून याप्रकारे कर्तव्यावर असलेले अधिकारी- कर्मचारी दारूचे नशेत राहत असल्याने परिसरातील आदिवासी जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. दारुड्या तलाठी राऊत यांची तात्काळ बदली करून दुसऱ्या तलाठ्याची या ठिकाणी नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.