Monday, December 23, 2024
Homeकृषी'सिबिल' च्या विरोधात मूर्तिजापूरात शेतकऱ्यांचा महामोर्चा...

‘सिबिल’ च्या विरोधात मूर्तिजापूरात शेतकऱ्यांचा महामोर्चा…

मूर्तिजापूर : शेतकऱ्यांना कर्ज पीक कर्ज घेण्यासाठी जाचक अटी लावण्यात आल्या आहे त्यात रिझर्व्ह बॅंकेने ‘सिबील’ अत्यंत भयंकर अट लावल्याने शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहत असल्याने ही अट रद्द करण्यासाठी शेतकरी जागर मंच्याच्या वतीने १ मे रोजी मूर्तिजापूर उपविभागीय कार्यालयावर महा मोर्चा काढण्यात आला. शेतकरी जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी अनेकांनी या जाचक अटी विरुध्द आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकरी जागर मंचाचे संयोजक यांनी आपली भूमिका मांडत सिबील म्हणजे काय या सविस्तर मांडणी करत ते म्हणाले की, शेतीसाठी पिककर्ज म्हणजे शेतकऱ्याला मोठा मदतीचा हात आहे. यापुढील काळात आपल्याला पिककर्ज मिळविताना आपली बँक सिबिल स्कोअर तपासूनच आपण कर्जास पात्रआहे किंवा नाही हे ठरविणार व त्यामुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहतील. यापूर्वी शेतकऱ्याला फक्त ७/१२ वर कर्ज मिळायचे व कर्ज देतांना इतर कोणतेही निकष शेतकऱ्यांना लागू नव्हते. नवीन सरकार-नवीन पध्दत आणि नवीन निकष यासर्व नवनवीन व चकचकित भारतात सिबिलचे भूत शेतकऱ्यांना कर्ज मिळूच देणार नाही. भारतीय रिझर्व बँकेने यावर्षीपासून (खरिप हंगाम २०२३ पासून) सर्व बँकांना सिबिल तपासूनच शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत. भारत सरकारने सुध्दा अशाच पध्दतीने शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याचे मान्यच केलेले आहे म्हणजेच ९२ टक्के शेतकरी पिककर्जासाठी अपात्र ठरणार.

सिबिल ही एक खाजगी संस्था असून ही आपणास आपल्या कर्जाच्या पात्रतेविषयी माहिती देते. यासोबतच विविध बँकांना सदर व्यक्तीस कर्ज वितरित करतांना काय जोखीम व
धोका असू शकतो याची माहिती देते. सर्वसाधारणपणे सर्व बँका शेतीकर्ज सोडून इतर सर्व कर्ज वितरित करण्यापूर्वी सिबिल स्कोअर तपासूनच कर्ज वितरित करतात. आपला
सिबिल स्कोअर जर ७२० गुणांपेक्षा कमी असेल तर बँक आपणांस कर्ज नाकारण्याची शक्यता खूप अधिक असते. शहरी भागातील व्यक्तिगत कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज व इतर सर्वप्रकारचे कर्ज आपला सिबिलस्कोअर तपासूनच देण्यात येते. या सर्व अटी रद्द करुन शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणेच कर्च वितरीत व्हावे अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेऊन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रशांत गावडे, सम्राट डोंगरदिवे, अक्षय तिडके, डॉ. श्रीकांत तिडके, भैय्यासाहेब तिडके, सुरेश जोगळे यांच बरोबर हजारो शेतकरी बैलडगाड्यांसह उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: