Monday, December 23, 2024
Homeराजकीयराज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात - नाना पटोले...

राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात – नाना पटोले…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु!

अतिवृष्टीनंतर परतीच्या पावसानेही शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान

शेतक-यांना तात्काळ मदत केली नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही!

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजून मिळालेला नाही,

पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकऱ्यावर निसर्गाने अवकृपा केली. राज्यातील विदर्भ, मराठावड्यासह काही भागात अतिवृष्टी झाली, त्यात शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी पिकं हातातून गेली. फळबागा व पालेभाज्यांनाही या पावसाचा फटका बसला, पशुधनाचेही नुकसान झाले. राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेश दिले पण स्थानिक पातळीवर प्रशासन कामच करत नसल्याचे चित्र आहे.

मी स्वतः विदर्भ व मराठवाड्यातील अतवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी पंचनामे करण्यास येतच नाहीत, जे काही पंचानामे होत आहेत ते वस्तुस्थिती पाहून केले जात नाहीत यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने जास्त मदत दिल्याची घोषणा केली पण ही मदतही तुटपुंजीच आहे आणि तीसुद्धा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तात्काळ दहा हजार रुपयांची रोख मदत दिली व नंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.

मविआचे सरकार येताच पहिला निर्णय शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. अटी, शर्थी, नियमांचे अडथळे निर्माण करुन शेतकऱ्याला ऑनलाईनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो.

काँग्रेस पक्षाने याधीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती पण राज्यातील ईडी सरकारने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले. आताही परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची यंदाची उरली सुरली स्वप्नेही धुळीस मिळवली आहेत पण सरकारला त्यांच्यातील भांडणातूनच वेळ मिळत नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून सरकारने लवकारत लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना मदत केली नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: