Friday, November 22, 2024
Homeराज्यशेतकरी आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाचे पाप :- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर...

शेतकरी आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाचे पाप :- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे टीकास्त्र…

सांगली – ज्योती मोरे

महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा देशात सर्वाधिक असताना डोळ्यावर कातडे पांघरून वसुलीबाजांची पाठराखण करणारे आता सत्ता गेल्यावर जागे झाले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना हा आकडा आपल्या सत्ताकाळातील असल्याचा विसर पडला आहे.

महाविकास आघाडीच्या अपयशाचे खापर युती सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न अजितदादा करत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे अजितदादा म्हणाले, ते खरे आहे. पण हा आकडा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या काळातील होता हे सत्य त्यांनी दडविले आहे. सन २०२०-२१ मध्ये देशात घडलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २५६७ घटना ह्या एकट्या महाराष्ट्रात घडल्या आहेत.

त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारमध्ये आपण उपमुख्यमंत्री होतो हे आता अजितदादा विसरूनदेखील गेले आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी मारला. शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेने (एनसीबीआर) अधिकृतपणे जाहीर केली आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या सहा महिन्यांतच महाराष्ट्रातील आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक वाढले होते. जानेवारी ते जून २०२२ या सहा महिन्यात एकट्या मराठवाड्यातच साडेपाचशे शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. तेव्हा ठाकरे सरकारने केवळ कागदावर जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना कृतीत आणली नाही म्हणूनच शेतकऱ्याच्या डोक्यावरील समस्यांचे ओझे संपले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्याला नगदी पिकांच्या मोहात अडकवून पारंपरिक शेती उद्ध्वस्त करणाऱ्या चुकीच्या कॉंग्रेसी कृषी धोरणामुळेच शेतकऱ्याच्या समस्या वाढल्या असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यास बाहेर काढण्याकरिता शिंदे-फडणवीस सरकार योग्य दीर्घकालीन उपाययोजना आखत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

२५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती व गावे जलसमृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतल्याबद्दल श्री. गोपीचंद पडळकर यांनी सरकारचे अभिनंदन केले. शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय असून समस्याग्रस्त शेतकऱ्यांना कृतीशील सहकार्याची गरज आहे, त्यामुळे अजितदादांनी या प्रश्नावर राजकारण न करता ठाकरे सरकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. गोपीचंद पडळकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: