रामटेक – राजु कापसे
रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) हद्दीत येणाऱ्या दाहोदा (घोटी) येथील एका शेतकऱ्यावर रात्रीच्या सुमारास हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.ही संपूर्ण घटना आज दि.26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास घडली…
प्राप्त माहितीनुसार,पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या दाहोदा (घोटी) येथील रहिवासी रामराव चापडे हे रात्री आपल्या राहत्या घरी झोपले असतांना त्यांच्या घराबाहेर बिबट्या आला.
व बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचा आवाज ऐकून रामराव जागे झाले आणि घराचे दार उघडताच कुत्रा स्वतःच्या बचावासाठी घराच्या आत जाण्याचा प्रयत्न करताच मागे लागलेल्या बिबट्याने रामराव यांच्या अंगावर हल्ला चढविला.यात ते गंभीर जखमी झाले..
या घटनेची माहिती पंचायत समिती रामटेक येथील सभापती चंद्रकांत कोडवते यांना कळताच त्यांनी जखमींचे घर गाठले.व पवनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांना घटनेची माहिती दिली.
तायडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळ गाठून जखमी रामराव यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे नेण्यात आले.व प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारासाठी लागणारा सर्व खर्च वनविभाग करणार असल्याची माहिती आहे.
या परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ काही होईना थांबेनासा झाला आहे.जंगली प्राणी आता गावात येऊन माणसांवर हल्ला करीत आहे.ही बाब अत्यंत चिंताजनक असून वनविभागाने वाघ,बिबट्याचा बंदोबस्त करून हद्दीतील सर्व गावात रात्रीला गस्ती लावावी व जखमी शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी सभापती चंद्रकांत कोडवते यांनी केली आहे…