न्युज डेस्क – प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदा जमाव जमवून जेसीबी, पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने चाकण एमआयडीसी हद्दीतील भांबोली (ता. खेड) येथील एका कंपनीच्या रस्त्यावर खड्डे पाडून आणि गॅस पाईपलाइन तोडून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणी कंपनीचे अधिकारी अजित रामदास पाटील (वय ३४, रा. चिंचवड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर (दोघेही रा. भांबोली, ता. खेड) व त्यांच्या १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य महाराज वाडेकर यांनी आपला भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने घराशेजारील कोरल लॉजिस्टिक इंडिया या कंपनीचा रस्ता रात्री उखडून टाकला व कंपनीचे कंपाऊंड तोडले.
संबंधित विकसकासोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कंपनीच्या वतीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करून महाळुंगे पोलिसांनी चैतन्य महाराज व त्यांचे भाऊ आणि इतर दोन अशा सहा जणांना अटक करून जेसीबी यंत्र जप्त केले आहे.