Sunday, November 17, 2024
Homeराज्यफडणवीसांची धडाडती तोफ… भारसाखळे यांची अनावर झोप… त्यावर त्यांनी केलेली सारवा सारव…आणि...

फडणवीसांची धडाडती तोफ… भारसाखळे यांची अनावर झोप… त्यावर त्यांनी केलेली सारवा सारव…आणि कार्यकर्त्यांवर आरोप…

आकोट – संजय आठवले

मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा आक्रोश, कार्यकर्ते आणि मतदारांची प्रचंड नाराजी, त्यात ढासळती प्रकृती, तरीही स्वत:ला दाखविण्याचा सोस ह्या गदारोळात देवेंद्र फडणवीस यांचे भाषणादरम्यान मंचावर डाराडूर झोपलेल्या आमदार भारसाखळे यांचा निद्राधीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल आणि चर्चेचा विषय झाल्यानंतर भारसाखळे यांनी ती झोप “नॅचरल” असल्याचे वक्तव्य वांगेश्वर येथील त्यांच्याच सत्कार सोहळ्यात करून झोपेचे महत्त्व श्रोत्यांना पटवून देण्याचा असफल प्रयत्न केला आहे. मात्र ते करताना त्यांनी कार्यकर्त्यांना चिमटे घेऊन फडणवीस यांचे भाषण आपण कान देऊन ऐकल्याचा बनाव केला आहे.

दिनांक ११ ऑगस्ट रोजी विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्ताने देवेंद्र फडणवीस अकोला येथे आले होते. बैठकीला जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, तमाम पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रकाश भारसाखळे सुद्धा फडणवीस यांच्या प्रतीक्षेत सकाळपासूनच उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी येताच फडणवीस थेट मंचावर स्थानापन्न झाले. कार्यक्रम सुरू झाला आणि फडणवीस भाषणाकरता उभे झाले. त्यावेळी त्यांचे मागील रांगेत डॉक्टर रणजीत पाटील आणि आमदार रणधीर सावरकरांच्या मध्ये आमदार भारसाखळे बसले होते.

ध्वनिक्षेपकासमोर फडणवीस यांची तोफ धडाडू लागली. पण त्याचवेळी आमदार भारसाखळे यांचे डोळ्यांवर झोप चढू लागली. फडणवीस उपस्थितांना निवडणुकीत विजयी होण्याचा कानमंत्र देऊ लागले आणि भारसाखळे मात्र विजयी झाल्याचे स्वप्न पहात डाराडून झोपी गेले. शेजारी बसलेले डॉक्टर पाटील आणि आमदार सावरकर हे मात्र दक्ष राहून फडणवीस यांचे भाषण ऐकत होते. परंतु त्या दोघांनीही भारसाखळे यांना सतर्क केले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमदार भारसाखळे हे वृद्धत्व, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि बहिरेपणाच्या व्याधीने ग्रासले असल्याचे त्यांना ठाऊक होते.

त्यामुळे या दोघांनीही भारसाखळे यांना जागविले नाही. परंतु मंचासमोरील श्रोत्यांना मात्र भारसाखळे यांची झोप खटकली. उपस्थित पत्रकारांनीही त्याची दखल घेतली. आणि क्षणात असंख्य मोबाईल मध्ये या झोपेचे चित्रीकरण झाले. आणि दुसऱ्याच क्षणी ते प्रचंड व्हायरलही झाले. अशातच फडणवीसांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्या वाजविल्या. त्याबरोबर भारसाखळे खडबडून जागे झाले. ते जागे झाले. परंतु त्यांचे डोळ्यांतील निद्रा राणीचे चित्र मात्र दूर दूर पर्यंत पोहोचले होते. त्याने भारसाखळे यांची मोठीच गोची झाली.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारसाखळे हे आपल्या प्रत्येक भाषणात सातत्याने “अभी तो मै जवान हूॅं” ची ग्वाही देत असतात. त्यांचा उच्च रक्तदाब, मधुमेह, कानाचा बहिरेपणा आणि वृद्धत्वाचा थकवा या बाबी ते प्रयत्नपूर्वक दडविण्याचा प्रयत्न करीत असतात. आकोट मतदार संघाची तिबार उमेदवारी मिळविण्याकरिता त्यांना हा प्रयास करावाच लागतो. परंतु त्यांच्या या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती स्थानिक स्पर्धकांनी पक्षश्रेष्ठींसमोर अनेकदा मांडलेली आहे. पक्षश्रेष्ठींनाही याची पूर्ण कल्पना आहे. परंतु या बैठकीच्या निमित्ताने मात्र पक्षश्रेष्ठींना भारसाखळे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा जिवंत पुरावा “याची देही याची डोळा” अवलोकावयास मिळाला आहे.

त्यामुळे आपले उमेदवारी करिता ही मोठी अडचण येणार असल्याने भारसाखळे मनोमन धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी ह्या झोपेच्या व्हायरल व्हिडिओकरिता काही कार्यकर्त्यांना टॉर्चरही केले आहे. पण हे टॉर्चर बूमरॅंगही होऊ शकत असल्याने तो टॉर्चर प्रयोग तिथेच थांबविण्यात आला. मात्र झाला प्रकार भारसाखळे यांना स्वस्थ बसू देणारा नव्हता. नेमक्या त्याच अस्वस्थतेच्या वातावरणात तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथे त्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. किंबहुना त्यांनीच तो घडवून आणला.

त्याचप्रसंगी बोलताना भारसाखळे यांनी ती झोप “नॅचरल” असल्याचे सांगितले. आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना ते बोलले कि, कुणाकुणाला मोठ्या स्पंजच्या गादीवरही झोप येत नाही. परंतु मला मात्र खुर्चीवर बसल्या बसल्या झोप येते. रात्री बारा वाजेपर्यंत बसतो. नंतर जेवतो. एका तासाने पाणी पितो. नंतर झोपतो. त्यामुळे खुर्चीवर ही झोप येते स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पण खुर्चीवर बसल्यावर झोप येणे हे शरीर दौर्बल्याचे प्रतीक आहे हे सांगणे मात्र त्यांनी टाळले. परंतु फडणवीस यांचे भाषण आपण ऐकल्याचे दाखविण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयासही केला. त्यावर ते म्हणाले कि मस्त जोरदार भाषण होते. विकासाचे होते.

परंतु भारसाखळे यांना जरी खुर्चीवर झोप येत असली तरी मतदार मात्र जागरुक झाले आहेत. त्यामुळे भारसाखळे यांचा सारवासारवीचा हा प्रकार सर्वांना उमगला आहे. त्यातच आता स्थानिक आमदार हवा ही हवा जोरात वाहू लागली आहे. त्यामुळे जनमत आपले बाजूस नसल्याची जाणीवही त्यांना होऊ लागली आहे. म्हणून झोप प्रकाराने आपल्या उमेदवारीस दगाफटका होऊ नये म्हणून ते आपली बाजू सावरण्याचा प्रयास करीत आहेत.

असे म्हणतात कि, झोप ही काळाची बहीण आहे. आणि नेमक्या वेळी नेमके काय करावे हे काळच ठरवीत असतो. त्यामुळे भारसाखळे यांच्या उमेदवारीबाबत काळाच्या गर्भात काय दडले आहे? हे येणारा काळच ठरवणार आहे हे जितके सत्य आहे तितकेच भारसाखळे हे शारीरिक दृष्ट्या फिट नाहीत हेही सत्य आहे. आणि हे सत्य खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेने टिपल्यामुळे भारसाखळे सद्यस्थितीत अस्वस्थ झालेले आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: