अमरावती – दि. १३ नोव्हेंबर २०२४ वाढत्या वयानुसार, तसेच संगणकावरील स्क्रिनिंग टाईम वाढल्यामुळे किंवा मोबाईलच्या अती वापरामुळे होणाऱ्या दृष्टिदोषावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारी हा उत्तम पर्याय आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांनी डोळ्याचीच नव्हे, तर एकुण आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून त्यावर उपचार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यानी केले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त महावितरण आणि यश नेत्रालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत भवन येथे कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अतुल कढाणे (यश नेत्रालय अमरावती), अधीक्षक अभियंते दीपक देवहाते, दिपाली माडेलवार, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता म्हणाले की, उत्तम आरोग्यासारखी दुसरी संपत्ती नाही. त्यामुळे योगासने, व्यायाम, चालणे इत्यादी कर्मचाऱ्यांनी दिनचर्येचा भाग करून घ्यावा. तसेच महावितरणच नाही, तर एकुणच सर्वच कार्यालयीन कामकाजाचे स्वरूप हे संगणकावर आधारीत झाले आहे.
त्यात मोबाईलाच वाढता वापर याचा परिणाम डोळ्यावर होऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. तर डॉ. अतुल कढाणे यांनी डोळ्याचे विविध आजार, निर्माण होणारे दोष, त्याची कारणे, विशेषता मधुमेह असलेल्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
नेत्र तपासणी दरम्यान संगणाकाव्दारे डोळे तपासणी करतांना रेटिनाचा फोटो आणि डोळ्याचा दाब मोजून डायबेटीक रेटिनोपॅथी बद्दल विशेष माहिती देण्यात आली.
विद्युत भवनात झालेल्या नेत्रतपासणी शिबिराचा लाभ मुख्य अभियंतासहीत एकुण ८६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंता प्रदीप पुनसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधूसुदन मराठे, कार्यकारी अभियंते राजेश माहुलकर, अमित शिवलकर, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक विजय पचारे, व्यवस्थापक विकास बांबल, कल्पना भुले आदींनी उपस्थित राहून आपल्या डोळ्याची तपासणी केली.