आकोट – संजय आठवले
एका रांगेने आणि एका मार्गाने संपन्न होणारी भव्य कावड यात्रा म्हणून अख्ख्या विदर्भात सुप्रसिद्ध असलेली आकोट शहरातील कावड शोभायात्रा यंदाही शिवभक्तांचा ओसंडता उत्साह, मंडळांचे सत्कार, अप्रतिम झाकीयाॅं, डिजेचा दणदणाट आणि कानात कापसाचे बोळे घातलेल्या स्थितीत संपन्न झाला असून ह्या शोभायात्रेत राजकारण्यांनी ही आपापल्या पद्धतीने आपली उपस्थिती नोंदविली.
गेल्या अनेक वर्षांपासून आकोट शहरात कावड यात्रा काढण्याची परंपरा आहे. सुरुवातीला पारंपारिक वाद्यांच्या गजरात दोन कलश बांधलेली कावड खांद्यावर घेऊन ही यात्रा निघायची. यावेळी भक्तगण महादेवाची गीते गात शहराचे वातावरण भारून टाकीत असत. अवघ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही यात्रा संपन्न होत असे. यात्रे दरम्यान अंगात येणे वगैरे प्रकारही होत असत. ह्या ५/५० कावड धार्यांमध्ये दोघा तिघांच्या हातात दानपेट्या असायच्या. त्यात रस्त्यातील लोक आपापल्या कुवतीनुसार दान टाकित असत. त्या दानातून या कावड यात्रेचा खर्च पूर्ण व्हायचा.
परंतु गत पाच सात वर्षांपासून ह्या कावड यात्रेचे स्वरूपच पालटून गेले. आणि आता दोन कलश बांधलेल्या कावडी कालबाह्य झाल्या असून त्यांची जागा अवजड वजनाच्या मोठ्या अजस्त्र कावडींनी घेतली आहे. त्या वाहून नेण्याकरिता भरपूर मनुष्यबळ उपयोगात येऊ लागले आहे. त्याकरिता अनेक मंडळे ही अस्तित्वात आली आहेत. पूर्वी दोन कलश बांधलेले कावड खांद्यावर घेऊन कावडधारी यात्रेत सहभागी व्हायचा. आता मात्र कावड यात्रेच्या एक महिन्यापूर्वीपासूनच यात्रेची तयारी करावी लागते.
त्याकरता खर्चही प्रचंड वाढला आहे. हा खर्च भागविण्याकरिता वर्गणीचा प्रकार ओघानेच आलेला आहे. त्यात झाकियाॅं आणि डीजेच्या खर्चाची मोठी भर पडली आहे. आपल्या मंडळाची कावड किती आकर्षक आणि आपल्या डीजे चा आवाज किती कर्णकर्कश याची अहम हमीका सुरू झालेली आहे. त्या स्पर्धेत टिकण्याकरिता आता लाखमोलाचे डीजे आणले जात आहेत. निवडणुकीच्या काळात युवकांची कुमक आपल्या कामी मिळावी म्हणून राजकारणी लोकही या खर्चात आपले योगदान देतात. अशा बदलत्या स्वरूपात आणि तरुणाईच्या अनावर उत्साहात आकोट शहरात दरसाल कावड यात्रा संपन्न केली जाते.
यंदाही या शोभायात्रेचा दिमाख लक्षवेधी ठरला. यावेळी या शोभा यात्रेत एकूण २८ कावड मंडळांनी सहभाग घेतला. भल्या पहाटेच शिवभक्तांची लगबग सुरू झाली. आणि वेळेवर ही यात्रा आपल्या मार्गाने निघाली. मार्गक्रमण करीत असतानाच शहरातील मार्गावर ठिकठिकाणी या यात्रेतील भाविक भक्तांचे चहापाणी आणि फराळाची व्यवस्था करणारे सेवाभावी सज्ज झाले. ठीक ठिकाणी होत असलेल्या फराळा सोबतच शहरातील सर्वच राजकीय पक्षांनीही फराळ आणि मंडळांचा सत्कार आयोजित केला होता.
ह्यावेळी शहरातीलच कारागिरांनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींनी शोभायात्रेचे आकर्षण आणखीनच वाढविले होते. ह्या झाकी बघण्याकरिता महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या शोभायात्रेत विलक्षण ध्यानात येणारी बाब ठरली सर्वसमावेशकता. या शोभायात्रेत अगदी अनपेक्षित घटकही मोठ्या उत्साहाने सामील झालेले बघावयास मिळाले. शोभा यात्रेत येणे न जमलेल्यांनीही शोभायात्रेचा योग्य तो सन्मान राखला.
परंतु या शोभा यात्रेत एक अतिशय गमतीदार बाप नजरेस पडली. ती म्हणजे डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजाचा परिणाम. यावेळी डीजेवाल्यांनी कधी नव्हे इतका आवाज चढविला. त्या आवाजाने दस्तूर खुद्द शिवभक्तांनाही त्रास होताना जाणवला. हा त्रास कमी करण्याकरिता शिवभक्तांनी आपल्या कानात चक्क कापसाचे बोळे कोंबलेले होते. ज्यांनी असे केले नाही, ते डीजे समोरून जाताना कानात बोटे टाकून पुढे जात होते. ह्या आवाजाने आपले कान सुन्न पडल्याची असंख्य्यांची प्रतिक्रिया होती. परंतु शिगेला पोहोचलेल्या उत्साहाच्या भरात ही शोभायात्रा निर्विघ्नपणे संपन्न झाली.
शोभा यात्रेवर नजर ठेवण्याकरिता प्रशासनाने ही पूर्ण सहकार्य केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल आणि पालिका मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे तसेच महसुल अधिकारी हे आपल्या ताफ्यांसह शोभायात्रा मार्गावर ग्रस्त घालताना दिसले. एकूण १४ पोलीस अधिकारी, १२० पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे 45 जवान, एस आर पी ची दोन प्लॅटून, सी सी कॅमेरा, एक व्हॅन असा ताफा ठिकठिकाणी आपले कर्तव्य बजावताना दिसला.