आकोट – संजय आठवले
आकोट शहरातून अकोला येथे शिक्षणाकरिता गेलेल्या अल्पवयीन बालिकेस चाकूचा धाक दाखवून वाहनाद्वारे आपल्या घरी नेल्यानंतर तिचे हातपाय बांधून व तोंडात बोळा कोंबून आरोपीने तिच्यावर दोनदा अतिप्रसंग केल्याची व तिने घरी सांगितल्यास तिच्या माता-पित्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सिव्हिल लाईन अकोला पोलीस स्टेशनचे हद्दीत घडली आहे. याप्रकरणी बालिकेच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी काही कार्यवाही करण्यापूर्वीच आरोपीने उच्च न्यायालयातून जामीनही मिळविल्याने जन मानसात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आकोट शहरातून नोकरी निमित्याने अकोला येथे राहावयास गेलेल्या परिवारातील सतरा वर्षीय मुलगी अचानक घरात गुमसुम राहू लागली. शिकवणी वर्गासहित जात नव्हती. मायबाप चिंतेत पडले. दि. १६ जुलै २०२४ रोजी अखेर मातेने मुलीला विश्वासात घेतले. आणि तिची मायेने विचारपूस केली. या चौकशीतून उलगडलेल्या कोड्यामुळे मुलीचे मायबाप जबर हादरले.
मुलीने सांगितले कि, दि.१४ जुलै २०२४ रोजी दुपारी एक ते दोन वाजता चे दरम्यान ती तोष्णीवाल लेआउट मधील प्रभात किड्स शाळेसमोरून तिच्या मावशीच्या घरी जात होती. तितक्यात तिथे सौरभ पुरुषोत्तम मुरकुटे हा युवक त्याच्या निळ्या रंगाच्या वाहनातून आला. त्याने तिला वाहनात बसण्यास सांगितले. मुलीने तसे करण्यास नकार दिला. त्यावर सौरभने तिला चाकूचा धाक दाखवून बळजोरीने वाहनात बसविले. आणि तुकाराम चौक येथील स्वतःचे घरी तिला घेऊन तो गेला.
घरात गेल्यावर त्याने घरातील त्याचा पाळीव कुत्रा मोकळा सोडला. आणि दरवाजा बंद केला. नंतर अश्लील भाषेत बोलत त्याने मुलीचे दोन्ही हातपाय बांधले. तोंडात कापसाचा बोळा कोंबला. आणि त्या असहाय मुलीवर त्याने दोनदा अतिप्रसंग केला. नंतर मुलीला हा प्रकार घरी न सांगण्याची त्याने तंबी दिली. सांगितल्यास तिच्या माता-पित्यांना जिवे मारण्याची आणि तिचे आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिली.
त्यानंतर सौरभने मुलीला पुन्हा वाहनात बसून महाकाली हॉटेल समोर सोडून दिले. नंतर तो तेथून निघून गेला. घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी आली. तेंव्हापासून तिने शिकवणी वर्ग ही सोडला. आणि घरातच गमसूम राहू लागली. हा अतिप्रसंग करणाऱ्या सौरभ मुरकुटे ह्याला ही मुलगी ओळखीत असल्याचे कारण हे कि, ह्या मुलीच्या पालकांची आणि सौरभचे पिता पुरुषोत्तम मुरकुटे यांची आधीपासूनच ओळख होती. त्यामुळे आपले घराचे वास्तुशांती सोहळ्याकरिता पुरुषोत्तम मुरकुटे यांनी पीडित मुलीच्या मातापित्यांना आमंत्रित केले होते.
त्यावेळी जाणे झाले नाही म्हणून पिडीतेचे माता-पिता पीडितेसह दोन-तीन दिवसांनी मुरकुटे यांचे घरी सदिच्छा भेटीस गेले. त्यावेळी पुरुषोत्तम मुरकुटे त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा सौरभ हे घरीच होते. दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांची वास्तपुस्त केली. एकमेकांच्या पाल्यांची आस्थेने चौकशी केली. त्यावेळी साहजिकच पीडित मुलीलाही मुरकुटे यांनी विचारपूस केली. तेव्हा तिने आपले शिक्षण व शिकवणी वर्गाबाबत माहिती दिली. थोडावेळ गप्पा मारून पिडीतेचे माता पिता पिडीतेसह स्वतःचे घरी परतले.
त्यानंतर काहीच दिवसांनी हा प्रकार घडला. या प्रकाराची मुलीच्या मातेने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या अन्वये पोलिसांनी सौरभ पुरुषोत्तम मुरकुटे याचे विरोधात भारतीय न्यास संहिता कलम १३७ (२) ६४ ६४(२) (m) BNS ३,४ अन्वये पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परंतु या प्रकरणात पोलिसांनी अतिशय संथ गतीने कारवाई केली. अशी कि ज्यामुळे आरोपीस न्यायालयात दाद मागण्याची पूर्ण संधी मिळावी. आणि झालेही तसेच. सौरभ मुरकुटे याने उच्च न्यायालयातून जामीन मिळविला.
संपूर्ण राज्यात शालेय मूलींचे विनयभंग, बलात्कार असे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्याबाबत समाजातील सर्वच स्तरातून अतिशय चीड व संताप व्यक्त होत आहे. आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांच्या मनात एक प्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे. अशा अतिशय बिकट वातावरणात अवघ्या काही दिवसातच आरोपी सौरभ मुरकुटे याला मिळालेला जामीन सर्वसामान्यांना बुचकळ्यात पाडणारा आहे. असे होण्यामागील शक्यतांबाबत असे कळले आहे कि, सौरभ मुरकुटे याचे अनेक राजकीय लोकांशी निकटचे संबंध आहेत. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे हा आरोपी जामीन मिळविण्यात सफल झाला असल्याची अटकळ लावली जात आहे.