मुंबई – गणेश तळेकर
चित्रपट, मालिका, जाहिरात, वेब सीरिज, वेब पोर्टल यासह करमणूक क्षेत्रासाठी राज्य सरकारने सर्वकष मानक कार्यप्रणाली (एसओपी) बुधवारी निश्चित केली. यात कामगारांचा पगार, विशेष भत्ते, बोनस, भविष्य निर्वाह निधी, रात्रपाळीत महिलांची सुरक्षा, कामगार विमा योजना आदींचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे निर्मात्यांकडून कलाकारांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. दुसरीकडे कलाकारांच्या संघटनांना अवैध ठरवतानाच त्यांची दादागिरी रोखण्यासाठी निर्मात्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचेही निराकरण केले जाणार आहे.
राज्याच्या उद्योग आणि कामगार विभागाने करमणूक क्षेत्रात निर्माते, मालक यांची जबाबदारी निश्चित करतानाच कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरिता एसओपी जारी केली आहे. चित्रपट, मालिका निर्मात्यांकडून कलाकार आणि सहाय्यकांचे मानधन थकवण्याचे प्रकार उघडकीस आले होते.
तसेच विविध कामगार संघटनांकडून ठरावीक कलाकारांना काम देण्याची सक्ती केली जात होती. विविध कारणांसाठी सेटवर धडक देत चित्रीकरण बंद पाडण्याचे प्रकार घडत होते या सर्व प्रकाराविरोधात सर्वकष धोरण निश्चित करण्याच मागणी सातत्याने केली जात होती.