Monday, December 23, 2024
Homeराज्यआखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा समावेश:भाजपमध्ये जाणार...

आखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा समावेश:भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला लागला ब्रेक…!

नांदेड – महेंद्र गायकवाड

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली असून मल्लिकार्जून खरगे यांनी या समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा समावेश केला आहे.त्यामुळे अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चेला आता पूर्णपणे ब्रेक मिळाला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक पाहता काँग्रेस पक्षाने वर्किंग कमिटी नुकतीच जाहीर केली. या कमिटीत महाराष्ट्रातून मुकुल वासनिक आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कायम निमंत्रित म्हणून समितीत घेतले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा मोठया प्रमाणात ऐकावयास मिळत होती. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या विधानपरिषदेच्या पराभवा नंतर व नव्या सरकारच्या बहुमत चाचणीत चव्हाण यांच्यासह तीन आमदार सभागृहात उशिरा पोहचल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याबद्दल कांहीजनानी पक्षांतर्गत धुसफूस व नाराजी व्यक्त केली होती.काँग्रेस पक्षातूनच अशोकराव चव्हाण यांची कोंडी केली जात आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा नांदेड जिल्हात रंगली होती.

तेव्हापासून अशोकराव चव्हाण हे भाजप मध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावंयास मिळत होती.परंतु अशोकराव चव्हाण यांनी वेळोवेळी या चर्चेचे खंडण करून आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.काँग्रेस पक्षाकडून अशोकराव चव्हाण यांनी दोन वेळेस मुख्यमंत्री पद भूषविले असून दोन वेळेस ते खासदार म्हणून निवडून आले आहेत.

अशोकराव चव्हाण हे 1992 ला विधानपरिषद सदस्य होते तर तर सन 1999,2004,2009,2019या कार्यकाळात विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आता पर्यत अनेक मंत्री पदे भूषविली असून ते एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.अशोकराव चव्हाण यांची पक्षात मोठी पकड व अनुभव पाहता काँग्रेस पक्षाने त्यांचा राष्ट्रीय पातळीवर समावेश केला आहे.अशोकराव चव्हाण यांनी वर्किंग कमिटी मध्ये संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत. त्यामुळे अशोकराव चव्हाण हे भाजप मध्ये जाणार या चर्चेला आता पूर्णपणे ब्रेक लागला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: