मुंबई – प्रफुल्ल शेवाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे पार पडला. राज्यभरातून सोशल मीडिया सेलच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने या मेळाव्यात सहभाग घेतला. पक्षाचा सोशल मीडिया सेल अधिक बळकट करण्यासाठी या मेळाव्यात मंथन करून पुढील दिशा ठरवण्यात आली.
आपल्या पक्षाची भूमिका जनतेपुढे मांडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही सर्व पक्षाचे सोशल मीडिया वॉरियर्स आहात असं म्हणत ना. अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. काही वर्षांपूर्वी प्रिंट मीडिया, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जनमाणसावर प्रभाव होता. आता याची जागा सोशल मीडियानं घेतलीय असं ना. अजितदादा यावेळी म्हणाले.
महायुती सरकारच्या माध्यमातून आपण राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतोय. आपले सहकारी देखील अनेक चांगल्या योजना जनतेसाठी आणत आहेत. त्या सर्व गोष्टी जनतेपुढे मांडण्याचे काम आपल्याला करायचंय आणि त्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं माध्यम असल्याचं ना. अजितदादा म्हणाले. सोशल मीडियावर व्यक्त होताना काही लोक खालच्या स्तरावर जाऊन गोष्टी मांडतात. असे प्रकार आपल्यापैकी कुणीही करू नये आणि याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.
या मेळाव्यात उपस्थित सोशल मीडिया पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ना. आदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आमदार अमोल मिटकरी, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं.
तसेच माध्यम क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन, ज्येष्ठ पत्रकार पराग पाटील, प्राध्यापक प्रशांत पवार, योगेश वागज, आशिष मेटे, गिरीश डोके या तज्ज्ञांनी सोशल मीडिया हातळण्याबाबत विविध मुद्यांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया प्रदेश सचिव आनंद पवार व प्रदेश प्रवक्त्या सायली दळवी-जाधव यांनी केले तर अर्पणा भोईर यांनी सर्वांचे आभार मानले.