‘नियोजन’ नावाच्या शस्त्राने स्पर्धा परीक्षेचे युद्ध जिंकता येते- आय ए एस सौम्या शर्मा
जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ग्रेटभेट उपक्रम…
नरखेड – अतुल दंढारे
आयुष्यात संकटे येत असतात,या संकटांना समस्या न समजता नवीन संधी समजून संकटांचा सामना करा. यश तुमच्या जवळ येईल.परिस्थितीचा बाऊ न करता नियोजन करून सात्यतपूर्ण अभ्यास करा, तुम्ही स्पर्धा परीक्षेत १००%यशस्वी व्हाल असा कानमंत्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (आय.ए.एस) यांनी दिला.
जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे ‘ग्रेटभेट’ उपक्रमातंर्गत जि.प.सीईओ सौम्या शर्मा यांनी विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती संजय डांगोरे तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संजय पाटील,गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, विस्तार अधिकारी उत्तम झेलगोंदे, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा कानमंत्र देतांना सातत्य,चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीचा वापर करायला लावला.तसेच मनाची एकाग्रता साधण्याकरिता योगासन व प्राणायाम करण्याचा सल्ला दिला.स्पर्धा परीक्षेचे युद्ध हे ‘नियोजन’ नावाच्या शस्त्राने विजयापर्यत नेऊ शकते असा हितोपदेश सौम्या शर्मा यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, संचालन केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे, तर आभार प्रदर्शन केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक परिचालक सतिष बागडे, शुभम शेंडे,अभय धुर्वे, प्रतिक मानेराव आदींनी सहकार्य केले.