मुंबई – गणेश तळेकर
एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱ्या ‘अस्तित्व’ आणि ‘चार मित्र’ कल्याण संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” छत्तिसाव्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक – २०२२’ मध्ये प्रवेश मुंबईची “हिलाऱ्या” आणि रंगवेद मुंबईची “अन्नपूर्णा हाज़िर हो” ह्या दोन्ही एकांकिकांना विभागून सर्वोकृष्ट एकांकिका घोषित करण्यात आलं. याच एकांकीकांनी सर्वाधिक वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिक पटकावली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कै. पद्मश्री सिंधूताई सपकाळ (माई) यांनी “भूक” हा विषय यंदा सादरीकरणासाठी सुचवला होता. त्या विषयाच्या अनुषंगाने १५ एकांकिका प्राथमिक फेरीत सादर झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण नीलकंठ कदम आणि हेमंत भालेकर यांनी केले.
गेली छत्तीस वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात, त्यामुळेच ही स्पर्धा वेगळी ठरते. याचा प्रत्यय यंदाही आला. मकरंद देशपांडे, वर्षा दांदळे, संदेश जाधव, प्रमोद शेलार, भाग्यश्री पाणे, सुनील हरिश्चंद्र, शीतल तळपदे, ही प्रस्थापित मंडळी आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेत आवर्जून उतरली.
अंतिम फेरीचे परीक्षण प्रख्यात लेखक ह्रिषीकेश कोळी, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर आणि ज्येष्ठ कवी नीलकंठ कदम यांनी केले.यंदाच्या स्पर्धेचा विषय सद्य स्थितीत अधिक समर्पक होता आणि पाचही एकांकिकांच्या संहिता तितक्याच ताकदीने सादर झाल्या, या एकांकिका स्वतंत्र एकांकिका आणि विषयाला धरून उत्कृष्ट आहेत आणि प्रत्येक एकांकिका समकालिन प्रायोगिक रंगमंचाकडे नेहण्यासाठी सक्षम आहे असं स्पष्ट जाणवलं.
लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक विभागून भाग्यश्री पाणे आणि मकरंद देशपांडे ह्यांना “हिलाऱ्या” आणि “अन्नपूर्णा हाज़िर हो” या एकांकिकांसाठी देण्यात आले, याच दोन एकांकिकांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक संदेश जाधव आणि मकरंद देशपांडे ह्यांना विभागून देण्यात आले. निशिगंध क्रिएशन्स ची “शे.उ.वा” एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकाचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पार पडलेल्या या स्पर्धेला दर्दी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कार
‘अस्तित्व’ – ‘चार मित्र’ कल्याण आयोजित
कल्पना एक आविष्कार अनेक (वर्ष ३६)
अंतिम फेरी – निकाल
• सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई आणि “अन्नपूर्णा हाज़िर हो”, रंगवेद मुंबई (विभागून)
• सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : “शे.उ.वा”, निशिगंध क्रिएशन्स
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संदेश जाधव ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई आणि मकरंद देशपांडे “अन्नपूर्णा हाज़िर हो”, रंगवेद मुंबई (विभागून)
• सर्वोत्कृष्ट लेखक : भाग्यश्री पाणे ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई आणि मकरंद देशपांडे “अन्नपूर्णा हाज़िर हो”, रंगवेद मुंबई (विभागून)
• सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) : कोमल वंजारे, ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई
• सर्वोत्कृष्ट अभिनय (द्वितीय) : निशित मोहिते “शे.उ.वा”, निशिगंध क्रिएशन्स
• सर्वोत्कृष्ट अभिनय (तृतीय) : सुनील हरिश्चंद्र, मुद्रा , इलाही थिएटर्स
• सर्वोत्कृष्ट अभिनय (चतुर्थ) : तुषार घाडीगांवकर, ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई
• सर्वोत्कृष्ट अभिनय (पंचम) : सोनाली मगर, मुद्रा , इलाही थिएटर्स
• सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार : शीतल तळपदे, “अन्नपूर्णा हाज़िर हो”, रंगवेद मुंबई
• सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : सुमीत पाटील, “अन्नपूर्णा हाज़िर हो”, रंगवेद मुंबई
• सर्वोत्कृष्ट संगीत – यशोधन पाणे, ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई
• अभिनय प्रशस्तीपत्र : मोहिनी टिल्लू – “अन्नपूर्णा हाज़िर हो”, रंगवेद मुंबई । मनाली जाधव – ‘हिलाऱ्या’, प्रवेश मुंबई । यज्ञेश विजय – अश्वमेध प्रोडक्शन
परीक्षक – मृणाल चेंबूरकर, नीलकंठ कदम, हृषीकेश कोळी