प्रतिनिधी, मुंबई
पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने येत्या 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान भंडारदरा आणि आंबोली येथे वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ.श्री.बी.एन.पाटील संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी दिली आहे.
आषाढातल्या बहुप्रतीक्षेनंतर अखेरीस अधिक श्रावणात पावसाचे दमदार आगमन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहत असलेला शेतकरी राजा त्यामुळे सुखावला आहे. महाराष्ट्रातल्या गावागावात पेरण्या करण्याचे काम जोरदार सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. परंतु या सगळ्यातलं समान सूत्र आणि समान धागा म्हणजे पाऊस पडतो आहे. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पासून सुरू होणार्या ह्या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांच्या दुर्लक्षित राहिलेले कलागुण. त्याचबरोबर खाद्य परंपरा. येथील दुर्गा आणि सुळके, येथील जैव विविधता अशा अनेक गोष्टींना व्यासपीठ देणारा हा महोत्सव खर्या अर्थाने भंडारदरा व आंबोली पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्रातल्या कला वैभवाची महोत्सवात पर्वणी
त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात कोसळणार्या पावसाचा आनंद घेतानाच, महाराष्ट्रातल्या कला वैभवाची पर्वणी पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांनी आणि पावसाच्या थेंबावर प्रेम करणार्या प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली पाहिजे आणि पावसाचे पाच दिवस मंतरलेले अनुभवलेच पाहिजेत, असे आवाहनही पर्यटन संचालकांनी केले आहे. जैव विविधता आणि निसर्ग सुंदरता यांचा आनंद पर्यटकांना घेता येईल. यामुळे स्थानिक पर्यटन वाढीसाठी मोठी मदत होईल असेही डॉ.पाटील यांनी सांगितले आहे.