सुदैवाने मोठी जिवितहानी टळली…
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील मळसूर गावंडगाव रस्त्यावर नवीन वीजपुरवठ्यासाठी खांब उभारण्याचे काम आठ दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले. मात्र, यामध्ये दुर्लक्ष आणि कामाच्या दर्जातील हलगर्जीपणामुळे एक खांब पूर्णतः जमीनदोस्त झाला असून उर्वरित खांब लोम्बकळलेल्या अवस्थेत आहेत.
या प्रकारामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला आहे आणि वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या कामासाठी दोन-दोन फूट खड्डे खोदून खांब उभारण्यात आले होते. मात्र, खांब उभारण्याच्या प्रक्रियेत भक्कम पाया नसल्याने हे खांब असुरक्षित स्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
खांब कोसळल्याने केवळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही, तर आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवून या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची मागणी केली आहे. खांबांना भक्कम आधार देऊन रस्ता मोकळा करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, अन्यथा या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
संबंधित विभागाकडून या समस्येची दखल घेतली जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे असले तरी कामाच्या दर्जाकडे देखील योग्य लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
गावंडगाव-मळसूर परिसरातील नविन रोवलेले खांब कोसळले असून जमिनीत दोन ते तीन फूटच खांब रोवल्याने सदर घटना घडली आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ महावितरणकडून सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शेतात उभे पिक असून ऐन पाणी देण्याच्या वेळी महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे पिक पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत, याचा त्वरित निपटारा न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
मळसूर – गावंडगाव परिसरातील नव्याने उभारलेले विजेचे खांब हलगर्जीपणामुळे कोसळले आहेत. फक्त दोन-तीन फुटांवर खांब रोवल्याने हा प्रकार घडला असून, नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. ऐन पाणी देण्याच्या हंगामात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे पीक वाळण्याच्या स्थितीत आहे.
जिवन चव्हाण
वाहनचालक व शेतकरी, गावंडगाव