महावितरणकडून वीजबिल वसुली मोहीम…
वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन…
अमरावती जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या १ हजार ९३० योजनांकडे वीजबिलाचे ७७ कोटी १३ लाख ४० हजार रूपये ,तर पथदिव्याच्या वीजबिलापोठी ११५ कोटी ८६ लाख ८८ हजार रूपये थकीत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत चालू अथवा थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मार्च महिन्याचे शेवटचे चार दिवस शिल्लक आहे.महावितरणचे अधिकारी,अभियंते व कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी दारोदारी फिरत आहे.घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडून महावितरणच्या प्रयत्नाला सहकार्य मिळत असले, तरी जिल्ह्यात पाणी पुरवठा आणि पथदिव्याचे वीजबिलाचे एकुण १९३ कोटी रूपये थकले आहे.
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे.तापमानात वाढ झाली आहे.त्याप्रमाणात विजेची मागणीही वाढत आहे.वाढत्या वीजेचे नियोजन करण्यासाठी वीजबिल वसुली होणे गरजेचे आहे.वारंवार विनंती आवाहन करूनही जे वीज ग्राहक चालू अथवा थकीत वीज बिलाचा भरणा करण्याला प्रतिसाद देत नाही,अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.
सर्वसामान्य जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळे येऊ नये,याची सामाजिक जाणिव ठेवत महावितरणकडून नळ योजनांचा व पथ दिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला नाही.परंतु वसुली शिवाय महावितरणकडे पर्याय नसल्याने महावितरणकडून आता नळयोजना व पथदिव्यांचाही वीज पुरवठा खंडित करण्याला सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात एकुण १ हजार ९३० पाणीपुरवठा योजनांकडे वीजबिलाचे ७७ कोटी १३ लाख ४० हजार रूपये थकले आहेत.यामध्ये महावितरणच्या अचलपूर विभागातील ६८२ नळयोजनांचा समावेश असुन त्यांच्या कडे २९ कोटी ५० लाख ५५ हजार रूपयाचे वीजबिल थकले आहे.अमरावती ग्रामीण विभागातील ६६१ नळयोजनांकडे २३ कोटी १४ लाख ७७ हजार थकीत आहे.
अमरावती शहर विभागाअंतर्गत येत असलेल्या १५२ नळयोजनांकडे ३७ लाख ५० हजार वीजबिलापोटी थकीत आहे,तर मोर्शी विभागातील ४३५ नळ योजनांची वीज देयकाचे २४ कोटी १० लाख ५७ हजार रूपये थकीत आहे. याचबरोबर पथदिव्यांचे ११५ कोटी ८६ लाख ८८ हजार वीजबिलाचे थकीत आहे.यामध्ये अचलपूर विभागात ३५ कोटी,अमरावती ग्रामीण विभागात ६५ कोटी ११ लाख ८६ हजार,अमरावती शहर विभागात ५० लाख ५५ हजार,तर मोर्शी विभागात १५ कोटी २४ लाख ४५ हजार थकीत आहे.