अहेरी : नळ योजनेच्या थकित वि द्यूत बिलाचा भरणा न केल्याने महावितरणने वीज कापल्याने आलापल्ली, नागेपल्ली येथील पाणी पुरवठा योजना मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्याने भर पावसाळ्यात दोन्ही गावातील नागरिकांची पाण्यासाठी फरफट होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संबंधित प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त होत आहे.
अहेरी तालुका मुख्यालयालगत असलेले आलापल्ली, नागेपल्ली ही दोन्ही गावे महत्वाचे स्थळ आहे. या दोन्ही गावातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्दात्त हेतूने शासनाने 20 ते 25 कोटी रुपये खर्ची घालून दोन्ही गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करुन घरोघरी नळ कनेक्शन दिले. यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला होता. मात्र संबंधित विभागाने वीज भरणा न केल्याने महावितरणने दोन्ही गावातील नळ योजनेची विद्यूत सेवा कपात केली आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही थकीत वीज बिलाची रक्कम न भरल्याने मागील तीन महिन्यांपासून नागरिकांना नळ योजनेअंतर्गत पाणी मिळणे बंद झाले आहे. परिणामी दोन्ही गावातील नागरिकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दोन्ही गावातील नागरीक ग्रामपंचायत प्रशासनाकडे पाणी कर नियमित देत असतांना नागरिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सदर नळ योजनेच्या देखभालीची जबाबदारी जीवन प्राधिकरण विभागाकडे आहे. मात्र संबंधित विभागाने थकित वीज बिलाचा भरणा करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांवर दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाप्रती दोन्ही गावातील नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींचेही गंभीर बाबीकडे दुर्लक्ष
मागील तीन महिन्यांपासून नागेपल्ली, आलापल्ली ग्रापंतील नळ योजना ठप्प पडली असल्याने भर पावसाळ्यात दोन्ही ग्रापंतील रहिवासीयांना सार्वजनीक विहिर तसेच हातपंपाचे दुषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी ससेहोलपट होत असतांना अहेरी येथील आजी, माजी लोकप्रतिनिधींनीही या गंभीर बाबीकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करुन समस्या सोडवावी, अशी मागणी नागेपल्ली, आलापल्ली ग्रापं हद्दीतील नागरिकांकडून होत आहे.