Sunday, December 22, 2024
Homeराजकीयराज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित, २८ नोव्हें. ते २० डिसे. पर्यंत नामनिर्देशन,...

राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित, २८ नोव्हें. ते २० डिसे. पर्यंत नामनिर्देशन, १८ डिसें. मतदान तर २० डिसें. रोजी निकाल, ९ नोव्हे. पासून आचारसंहिता जारी…

आकोट – संजय आठवले

राज्य निवडणूक आयोगाने थेट सरपंच पदासह राज्याच्या विविध जिल्ह्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित केल्या असून या सर्व निवडणुकांकरिता २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन करावयाचे आहे. १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ९ नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालामध्ये न आल्याने मागील सार्वत्रिक निवडणुकांपासून वगळलेल्या या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- २०३, अकोला- २६६, अमरावती- २५७, औरंगाबाद- २१९, बीड- ७०४, भंडारा- ३६३. बुलडाणा- २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, जळगाव १४०, जालना- २६६, कोल्हापूर- ४७५, लातूर- ३५१, नागपूर- २३७, नंदुरबार- १२३. उस्मानाबाद १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१. रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, सांगली- ४५२, सातारा – ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, वाशीम- २८७, यवतमाळ १००, नांदेड- १८१ व नाशिक- १९६. एकूण ७,७५१.

अकोट तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींचा निवडणुकीत समावेश

या निवडणुकांमध्ये आकोट तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. मागील निवडणुकीमध्ये आकोट तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या आरक्षित जागेकरिता उमेदवारच न मिळाल्याने यावेळी नियमानुसार तेथील आरक्षण बदलून तेथील सरपंचपदांची ही निवडणूक होऊ घातली आहे. चोहोट्टा, पातोंडा, मंचनपूर, सावरा व मकरमपूर ह्या त्या ५ ग्रामपंचायती आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: