Monday, December 23, 2024
Homeराज्यएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत :- नाना पटोले…

तिघाडी सरकारने राज्याचा सामाजिक समतोल बिघडवून विद्वेषाची बिजे पेरली…

ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकार पुरस्कृत नौटंकी…

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत आहेत. छगन भुजबळ हे आपण राजीनामा दिल्याचे सांगत आहेत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र याबाबत काहीच बोलत नाहीत.

महाराष्ट्रात सध्या महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत हे स्पष्ट आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक सरकारने सत्तेत येताना संविधानाला पायदळी तुडवून लोकशाहीला काळीमा फासला आणि आता सत्तेत आल्यापासून राज्यातला सामाजिक समतोल बिघडवून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणतात मी १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि त्यानंतरच ओबीसी आरक्षण बचावासाठी मेळावे सुरु केले आणि सोबतच ते म्हणतात राजीनाम्याबाबत वाच्यता न करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. म्हणजे भुजबळांचे बोलविते धनी सरकारच आहे.

भुजबळ ओबीसींच्या बाजूने बोलत असल्याचे दाखवत आहेत आणि शिंदे गटाचे आमदार भुजबळांच्या विरोधात बोलत आहेत. ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री कोणीही यांना रोखत नाही उलट त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात मराठा ओबीसी समाजात भांडणे लावण्याचे सरकारच करत आहे हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत, आज त्याला पुष्टी मिळत आहे.

या सगळ्या वादामध्ये आणि चिखलफेकीमध्ये महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या याबद्दल सरकार चकार शब्द काढत नाही. किंबहुना या मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकारनेच हा वाद सुरु केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती पूर्ण केली असे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व तमाम शिवप्रेमी जनतेचा घोर अपमान केला आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी छत्रपतींचा वारंवार अपमान केला जात आहे.

शिंदे-भाजपा सरकार मराठा व ओबीसी समाज या दोघांनाही फसवत आहेत पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, आरक्षणाच्या नावावर लोकांची डोकी फोडू नका, महाराष्ट्र पेटवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते जनतेने यशस्वी होऊ दिले नाहीत आता आरक्षणाचा वाद पेटवून गावखेड्यातील वातावरणही दुषीत करण्याचे पाप केले जात आहे. राजकीय स्वार्थासाठी सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या या शिंदे-भाजपा व अजित पवार सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असे नाना पटोले यांनी खडसावून सांगितले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: