Monday, December 23, 2024
Homeराजकीयआमदार भारसाखळेंबाबतचा असंतोष दाबण्याकरिता त्यांच्या अतिउत्साही समर्थकांचा प्रयत्न… नगरपरिषद निर्मितीसह हिवरखेडला तालुका...

आमदार भारसाखळेंबाबतचा असंतोष दाबण्याकरिता त्यांच्या अतिउत्साही समर्थकांचा प्रयत्न… नगरपरिषद निर्मितीसह हिवरखेडला तालुका बनविण्याचे घातले साकडे…

आकोट – संजय आठवले

संपूर्ण हिवरखेड नगरीत नगरपंचायत निर्मितीचे आणि या निर्मितीवर स्थगिती आणल्याने आमदार भारसाखळे यांचेबाबत असंतोषाचे वारे जोरदार वाहत असतानाच या वाऱ्याची दिशा बदलण्याचा प्रयास आमदार समर्थकांद्वारे केल्या जात असून त्याकरिता नगरपरिषद निर्मितीसह हिवरखेडला तालुका बनविण्याचे साकडे या अति उत्साही समर्थकांनी त्यांना घातले आहे. परिणामी हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये परिवर्तित करण्याच्या व त्यावर स्थगिती आणल्याने निर्माण झालेल्या असंतोषाच्या वाऱ्याचा रोख बदलण्याऐवजी भारसाखळेंची गोची होत असल्याचे दिसत आहे.

सद्यस्थितीत हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये परिवर्तित करण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. या मागणीच्या समर्थनात अनेक घटक पुढे येत आहेत. हा मुद्दा मोठ्या आंदोलनात परिवर्तित होऊ नये म्हणून आमदार भारसाखळेंनी नगरपंचायत निर्मितीवर स्थगिती आणली आहे.

सोबतच त्याऐवजी नगरपरिषद देतो, असा “चिंधीचा साप” सोडला आहे. पण अचाट शक्तीच्या या दोन्ही पोचट प्रयोगांचे “बूमरॅंग” झाले आहे. हिवरखेडकरांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांचे मनात आमदारांबाबत असंतोषाने घर केले आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत नगरपंचायतच हवी आहे. ती न झाल्यास कोणत्याही टोकास जाण्याची त्यांची तयारी आहे.

अशातच हिवरखेड नगरपंचायत निर्मितीवर २१ लोकांनी आक्षेप नोंदविले होते. त्यावर प्रशासनाने सुनावणी घेतली. त्यावेळी नऊ लोकांनी ह्या आक्षेपांची आपला संबंध नाकारला. नगरपंचायतीला समर्थन दिले. दहा लोक दोनदा नोटिसेस देऊनही सुनावणीस हजर झाले नाहीत. एकाने हजर न होता आक्षेपाशी सहमती दर्शविली. तर एकाने लिखित जबाब न देता आक्षेप अर्जाशी सहमती दर्शविली. अशा स्थितीने एकही आक्षेप तग धरू शकला नाही. परिणामी सारे आक्षेप खारिज झाले. सोबतच शासन दरबारी या मुद्द्यावर अनेक आक्षेप असल्याचे पत्र देणारे आमदार भारसाखळे तोंडघशी आपटले.

त्याने नगरपंचायत मुद्द्यावर हिवरखेडकर एकमताने एकवटल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे व्यापक जनभावनांचा आमदार भारसाकळेंनी आदर करणे अपेक्षित आहे. मात्र ते नकारघंटा बडविण्यातच मश्गूल आहेत. त्याने जनमत चांगलेच तापले आहे. त्याचे भविष्यातील दुष्परिणाम भारसाकळेंनाही दिसत आहेत. मात्र त्यांचे पेक्षा अधिक त्यांच्या समर्थकांना दिसत आहेत. त्यामुळे ते बिचारे जनमत सावरण्याचा असफल प्रयत्न करीत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून या समर्थकांनी नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद व सोबतीला तालुका मागण्याचा सूर आळविला आहे. मात्र त्यांचा हा सूर बेसूर होऊन आमदारांचीच गोची करणारा असल्याचे त्यांचे ध्यानातच आलेले नाही. त्याचे असे झाले की, हिवरखेड येथील पत्रकार किरण सेदाणी यांना पत्रकारितेमधील पुरस्कार मिळाला आहे. त्याबाबत त्यांचे अभिनंदन करण्याकरिता आमदार भारसाकळे त्यांचे घरी गेले. त्या ठिकाणी काही पत्रकार आधीच आलेले होते.

काही लोकांना नंतर बोलाविण्यात आले. सेदाणी यांचे अभिनंदन केल्यावर तेथे गप्पांचा फड रंगला. यादरम्यान काही अति उत्साही समर्थकांनी लगेच एक निवेदन तयार करून ते आमदारांना देण्याचा विधीही उरकून टाकला. या निवेदनात हिवरखेड येथे नगरपरिषद होण्याची आवश्यकता विषद केलेली होती. सोबतच हिवरखेडला तालुक्याचा दर्जा देण्याचीही मागणी केलेली होती. असे केल्याने हिवरखेडचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे भाकितही या निवेदनात केलेले होते.
आमदार समर्थकांच्या ह्या नौटंकीने अनेक मजेदार प्रश्नांना जन्म दिला आहे. यातील पहिलाच प्रश्न आहे की, हिवरखेड तालुका होऊ शकतो काय? याचे उत्तर आहे, अजिबात नाही. त्यावर दुसरा प्रश्न येतो, मग ही मागणी का केली गेली? याचे उत्तर आहे, बुद्धीचे दिवाळी निघाले म्हणून. त्यावर तिसरा प्रश्न आहे, आमदार ही मागणी पूर्ण करतील काय? याचे उत्तर आहे, कधीच नाही. त्यावर चौथा प्रश्न आहे, अशा मागणीने आमदार अडचणीत येणार नाहीत काय? याचे उत्तर आहे, अलबत. अडचणीत येणारच. म्हणजे माहिती व ज्ञानाअभावी नको त्या मागणीने आमदार भारसाखळेंना त्यांच्या समर्थकांनी अडचणीत आणले आहे.

दुसरा मुद्दा आहे नगरपरिषद निर्मितीचा. यातील गोम अशी आहे की, “क” वर्ग पालिका निर्मितीकरिता तेथील लोकसंख्या २५ हजाराचे वर असावेच लागते. आज रोजी हिवरखेडची शासनमान्य लोकसंख्या २३ हजार २१६ इतकी आहे. वास्तवात ती २५ हजाराचे वर आहे. मात्र शासनाने ती निश्चित केलेली नाही. जनगणने नंतरच ती निश्चित केली जाऊ शकते. जनगणना आताच होण्याचे दृष्टीपथात नाही. त्यामुळे आज रोजी हिवरखेड ची लोकसंख्या २३ हजार २१६ इतकीच गृहीत धरली जाणार आहे.

आणि लोकसंख्येच्या या पहिल्या निकषाची पूर्तता झाल्याखेरिज शासन पालिका करणे संदर्भात विचारच करित नाही. त्यामुळे जनगणने पर्यंत थांबावे लागणार आहे. त्यातच भारसाखळेंच्या सरकारवर न्यायालयाची टांगती तलवार आहे. हे सरकार कधी कोसळेल याचा नेम नाही. कोसळले तर पुन्हा निवडणुका लागतील. त्यावेळी भारसाखळींना भाजप उमेदवारी देईलच याचा भरवसा नाही. उमेदवारी मिळाली तरी ते निवडून येतीलच याची गॅरंटीही नाही आणि वॉरंटीही नाही. म्हणजे नगरपरिषद हा निव्वळ फुसका बार आहे. म्हणजेच ही मागणी करून या समर्थकांनी आमदार भारसाखळेंची अडचण वाढविली आहे.

तिसरा मुद्दा आहे हिवरखेड नगर परिषद झाल्याने तेथील सर्वांगीण विकास होण्याचा. हा मुद्दा फारच मजेशीर आहे. याचे कारण म्हणजे हिवरखेड ग्रामपंचायत होण्यावर स्थगिती आणण्याकरिता भारसाखळेंनी उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले. त्या पत्रात त्यांनी युक्तिवाद केला की, “हिवरखेड नगरपंचायत झाल्यास तेथील लोकांना उपासमारीकडे जावे लागेल. तेथील विकास खूंटेल.” नगरपंचायत ही पालिकेपेक्षा लहान असते. ती झाल्यानेच जर हिवरखेडकर उपासमारीकडे जाणार असतील, त्यांचा विकास खुंटणार असेल तर पालिका झाल्याने तर ते मरूनच जातील.

मग त्यांचा कोणता डोंबलाचा सर्वांगीण विकास होणार आहे? हा प्रश्न उपस्थित होत असल्याने आमदार आपल्याच युक्तीवादाविरोधात जाऊन नगरपरिषद करण्याची मागणी पूर्ण करू शकतील काय? हा दुसरा मोठा प्रश्न आहे. म्हणजेच आमदारांच्या पत्रातील युक्तीवादाविरोधात मागणी करून या समर्थकांनी आमदारांच्या वाढलेल्या अडचणीला अधिकच किचकट केले आहे. अशाप्रकारे हिवरखेड येथे भारसाखळेंबाबत निर्माण झालेल्या असंतोषाला शमविण्याकरिता त्यांच्या उत्साही समर्थकांनी मजेदार बनविले आहे. परंतु हा असंतोष शमला तर गेला नाहीच उलट याबाबत टिंगल टवाळीला मात्र ऊत आलेला दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: