अमरावती – दुर्वास रोकडे
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी जनसामान्यामध्ये जनजागृती करुन तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हा सामान्य रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू मुक्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रीती मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद नेवाळे, जिल्हा रुग्णालयाचे डेंटल सर्जन डॉ. अभिजीत वानखेडे, डॉ. मंगेश गुजर, राज्य प्रशिक्षक अभिजीत संगई, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थाचे प्रकल्प अधिकारी डॉ. निकिता गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम अत्यंत दूरगामी असल्यामुळे कोट्पा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करणे सर्व विभागांची जबाबदारी आहे. यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये व्यापक प्रसिद्धी करावी. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे व तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. सर्व शासकीय कार्यालयात कोट्पा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, याची कार्यालय प्रमुखानी खात्री करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रकल्प अधिकारी डॉ. निकिता गायकवाड यांनी तर सुत्रसंचालन विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्र तज्ञ उद्धव जुकरे, सामाजिक कार्यकर्ता पवन दारोकर, गणेश उगले, प्रदीप तांदळे यांनी परिश्रम घेतले.