Edible Oil Prices : देशातील वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विविध खाद्यतेलाच्या किमती घसरल्याचा परिणाम आता देशातील प्रमुख धान्य बाजारात दिसून येत आहे. घाऊक बाजारात आणि मंडईत खाद्यतेलाचे दर घसरायला लागले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या खाद्यतेलाच्या किमती सरासरी 10 ते 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. दिल्लीच्या सर्वात मोठ्या धान्य बाजारात गेल्या दोन आठवड्यात सर्व प्रकारची खाद्यतेल 10 ते 15 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.
स्थानिक मोहरीचे तेल 130 रुपये किलोवरून 100 ते 105 रुपये किलोवर आले आहे. ब्रँडेड मोहरीच्या तेलाची किंमत 155 रुपये किलोवरून 125 ते 130 रुपये किलोवर आली आहे. पाम तेलाच्या 10 लिटरच्या बॉक्सची किंमत 2 आठवड्यांपूर्वी 1050 रुपये प्रति बॉक्स होती, ती आता 950 रुपये प्रति बॉक्सवर आली आहे. तर सोयाबीन तेलाचा भाव 125 रुपयांवरून 100 रुपये किलोवर आला आहे, म्हणजेच 25 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
देशात खाद्यतेलाची एकूण मागणी सुमारे २५५ लाख मेट्रिक टन आहे.
वास्तविक, भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात करून पूर्ण करतो. देशातील खाद्यतेलाची एकूण मागणी सुमारे 255 लाख मेट्रिक टन आहे तर देशातील खाद्यतेलाचे एकूण देशांतर्गत उत्पादन सुमारे 115 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजेच खाद्यतेलाची मागणी आणि पुरवठा यामध्ये सुमारे 140 लाख मेट्रिक टनाचा फरक आहे. हे आयातीद्वारे पूर्ण केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्यामुळे खाद्यतेलाच्या आयातीवरील भारताचा खर्च कमी झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची किंमत 200 ते 250 डॉलर प्रति टन इतकी कमी झाली आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम भारतातील प्रमुख धान्य बाजारपेठेत दिसून येत असून खाद्यतेलाच्या घाऊक किमतीत सातत्याने घसरण होत आहे. मात्र, किरकोळ बाजारात त्याचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल.