आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मोठी कारवाई करीत आहेत. सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लालूंच्या कुटुंबीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी, आयआरसीटीसी प्रकरणातही ईडीचे एक पथक लालूंच्या निकटवर्तीय अबू दुजानाच्या घरी पोहोचले होते.
विशेष म्हणजे मंगळवारी सीबीआयच्या पथकाने नोकरीसाठी जमीन प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची चौकशी केली. सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची जवळपास पाच तास चौकशी केली. दुपारच्या जेवणापूर्वी दोन तासांहून अधिक काळ आणि त्यानंतर सुमारे तीन तासांपर्यंत टीमने आरजेडी सुप्रिमोला प्रश्न विचारले. त्याचवेळी याच प्रकरणात लालूंची पत्नी राबडी देवी यांची सोमवारी पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली.