अमरावती – महावितरण अमरावती परिमंडळ मुख्य अभियंतापदी श्री ज्ञानेश कुलकर्णी हे रूजू झाले आहे. यापुर्वीच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांची गोंदीया येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा अधिक पारदर्शक आणि गतीमान करण्यावर भर राहणार असल्याचे मत पदभार स्वीकारतांना त्यांनी व्यक्त केले.
तत्कालीन वीज मंडळ आणि आता महावितरणसारख्या महत्वाच्या आणि राज्यव्यापी वीज कंपनीमध्ये काम करतांना कनिष्ठ अभियंता ते अधीक्षक अभियंता असा २८ वर्षाचा विशेषत: पारेषण,चाचणी आणि वाणिज्यिक विभागातील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. श्री.ज्ञानेश कुलकर्णी यांनी केलेल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामाची दखल घेत महाराष्ट्र शासन व महावितरणकडून त्यांना २०१४ मध्ये जपान या देशाच्या अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात आले होते.
ज्ञानेश कुलकर्णी यांची पदोन्नतीवर अमरावती येथे बदली झाली असून याअगोदर ते अधीक्षक अभियंता वाणिज्य आणि ओपन एक्सेस म्हणून मुख्य कार्यालय येथे जबाबदारी सांभाळत होते. मुळचे कराडचे असलेले कुलकर्णी यांची महावितरणच्या सरळ सेवेतून वर्ष २००७ मध्ये अतीरिक्त कार्यकारी अभियंता,वर्ष २००९ मध्ये कार्यकारी अभियंता आणि वर्ष २०१६ मध्ये अधीक्षक अभियंता पदावर निवड झाली आहे. प्रत्येकाची कामाप्रती असलेली प्रामाणिकता,चिकाटी आणि कामात सातत्य असल्यास यश हे निश्चित असल्याचे मत पदभार स्वीकारतांना त्यांनी व्यक्त केले.