Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingद्वारकानाथ संझगिरी यांचा अप्रतिम लेख "मॅनेजमेंट गुरुदेव"...

द्वारकानाथ संझगिरी यांचा अप्रतिम लेख “मॅनेजमेंट गुरुदेव”…

महाराष्ट्रात भागोजी कीर हे नाव फारसं कोणाला ठाउक नसेल. पण मॅनेजमेंट गुरुदेव म्हणून या व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल इतके महान कार्य त्यांनी केले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भागोजी कीर यांचा जन्म झाला आणि याच महाशिवरात्रीच्या तिथीला त्यांची पुण्यतिथीदेखील असते, ही एक दैवाची लीला. आज त्यांचे पुण्यस्मरण करताना त्यांच्या जीवनावरील हा लेख संक्षिप्तरूपाने.

दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत.मी एका तरुणाला, जो दादरमध्ये राहतो, ज्याचं वाचन चांगलं आहे, त्याला विचारलं, ‘‘तुला भागोजी कीर माहीत आहेत ???’’ तो म्हणाला, ‘‘हो, दादरच्या स्मशानाला त्यांचं नाव दिलंय.’’ ‘‘त्यांच्याबद्दल आणखी काही माहिती ???’’ मी विचारलं.त्याने मान हलवली.

आपण ज्या विभागात राहतो तिथे वेगवेगळे रस्ते असतात. त्या रस्त्यांना त्या भागातल्या किंवा समाजातल्या महनीय व्यक्तींची नावं दिलेली असतात. पण त्यांचे कार्य आपणाला माहीत नसते. कारण काळ इतक्या झपाट्याने बदलतो, वर्तमानकाळ इतका वेगवान असतो, की कुणाला भूतकाळात डोकवायलाही फुरसत नसते. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएम मध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.

१८६७ मध्ये अठराविश्वे दारिद्र्यात भागोजी यांचा जन्म झाला आणि बालपण गेलं. ज्या वयात खेळायचं त्या वयात सोनचाफ्याची फुलं आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. हे सर्व करताना ते रत्नागिरीच्या किल्ल्यातल्या एका झोपडीत राहात होते.

रत्नागिरीचा हा रत्नदुर्ग किल्ला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो विजापूरकरांकडून जिंकून घेतला होता. कदाचित ह्या ऐतिहासिक किल्ल्यापासून छोट्या भागोजीने स्फूर्ती घेतली असेल, पुढे आपलं स्वतःचं असं छोटं उद्योगधंद्यांचं राज्य उभारण्यासाठी. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळोजी शेतमजूर होते.

भागोजीला शिकायचं होतं. पण शिकण्यासाठी पैसे कुठून आणायचे ??? त्याकाळी ख्रिश्र्चन मिशनर्‍यांच्या शाळा होत्या. पण तिथे गरीब मुलांना शिक्षण परवडत नसे. त्यांनी सरकारी शाळेत प्रवेश मिळवला. तिथे शिक्षण फुकट होतं. पण जेवण फुकट नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी सोनचाफ्याची दोन फुलं आणि उंडलाच्या बिया (त्यातून कडू तेल काढतात) विकून त्यातून वह्या-पुस्तकांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला. ‘कमवा आणि शिका’ ह्याची सुरुवात भागोजीने इतक्या कोवळ्या वयात केली होती.

मुंबई ही भागोजींसाठी स्वप्ननगरी होती. पण मुंबईला जायचं कसं ??? तिथे गेल्यावर कुठे राहायचं ??? त्यांना काहीही ठाऊक नव्हतं. समोर अंधःकार होता. पण महत्त्वाकांक्षी माणूस अंधारात उडी मारायला घाबरत नाही. त्यांनी उडी घेतली. ते बंदरावर गेले. खिशात पैसे नाहीत. त्यांनी तांडेलाला विनंती केली. ‘‘पैसे नाहीत. पण बोटीवर घेणार का ??? मुंबईत नशीब काढायचंय !!!’’ देव कधी कधी कुणाच्याही रूपात मदत करतो. इथे भागोजी कीर यांच्यासाठी तांडेल देव झाला.

त्यांनी मुंबईत पाय ठेवला. एकट्याने !!! वय किती ??? अवघं बारा !!! बाराव्या वर्षी अंधारातून जायलाही मुलांना सोबत लागते. इथे हा भागोजी मिट्ट अंधारातून उजेड शोधत मुंबईत आला. मुंबईत त्यांना पुन्हा देव एका सुताराच्या रूपात भेटला. त्याने भागोजीला जवळ ठेवलं. रंधा मारायचं काम दिलं. दिवसाला दोन आणे मिळायचे.

ज्यांच्याकडे कल्पकता असते, धंद्याची बुद्धिमत्ता असते, त्यांना कचर्‍यातही लक्ष्मी दिसते. ती या छोट्या भागोजीला दिसली. तो सुताराच्या परवानगीने जाळण्यासाठी लाकडाचा भुसा बाजारात विकायला लागला. त्याला आणखी दोन आणे मिळायला लागले. जमतील तेवढे पैसे भागोजी घरी पाठवू लागला.

त्याला नंतर तिसरा देव भेटला. हा साधासुधा देव नव्हता. तो ब्रह्मदेव होता. जग निर्माण करणारा. त्याचं नाव पालनजी मिस्त्री !!! शापूरजी पालनजी मधला पालनजी. हा माणूस मोठमोठ्या इमारती बांधून मुंबईचं रूप बदलत होता. त्याला भागोजी आवडला. पण देव प्रसन्न व्हायच्या आधी परीक्षा घेतो. त्याने भागोजीची परीक्षा घेतली. त्याने लाकडाच्या भुशात पैशाच्या नोटा ठेवल्या. भागोजीला नोटा सापडल्या. तिथल्या तिथे तो मालामाल झाला असता.

पण तो प्रामाणिक होता. त्याला श्रीमंत व्हायचं होतं, पण प्रामाणिकपणे. आजच्या पिढीचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. कारण हे वाक्य आता ब्रीदवाक्य झालंय. पण एकेकाळी माणसाला प्रामाणिकपणाही श्रीमंत बनवत असे. त्याने नोटा परत केल्या. त्याच्यावर शापूरजी प्रसन्न झाला. त्यांनी भागोजीला कॉन्ट्रॅक्ट्‌स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्‌स त्यांच्याकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुलं विकून शिक्षण घेणारा रत्नागिरीचा भागोजी मुंबईचा शिल्पकार बनला.

मुंबईतल्या कुठल्या इमारतींत त्याचा अनमोल वाटा आहे, ठाऊक आहे ??? लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग वगैरे वगैरे. या वगैरे वगैरेत बरंच आहे. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी काँक्रीटची भिंतही त्यांचीच !!!

शून्यातून जग उभारणं हा वाक्‌प्रचार हा माणूस इतका जगला की वाक्‌प्रचाराला आपल्यासारखं मन आणि बुद्धी असती तर तोसुद्धा तृप्त झाला असता. आजच्या युगात भागोजी कीर झाले असते ना, मॅनेजमेंट गुरू ??? खरं तर गुरुदेव म्हणूया !!! त्यांना आणखी एक नाव पडलं असतं. आजच्या युगात ‘वॉरन बफे किंवा बिल गेटस्‌’. कारण त्यांनी फक्त पैसा उभारला नाही. सामाजिक कार्य केलं. एका शेतमजुराचा मुलगा, श्रीमान भागोजीशेठ कीर झाला आणि त्याने सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य हाती घेतलं.

ते गाडगेमहाराजांना आध्यात्मिक गुरू मानत. गाडगेमहाराजांनी देव कधी देवळात शोधलाच नाही. त्यांना तो गरीब, दलित, थोडक्यात पददलितांत सापडला. त्यांनी भागोजींना सांगितलं, ‘‘आळंदीत धर्मशाळा बांधा. तिथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू करा.’’ भागोजी कीरांनी ते सुरू केलं. त्यांना शिक्षणाची आवड होती. पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नव्हतं. त्यामुळे गरीब, होतकरू मुलांच्या शिक्षणाची आपल्याप्रमाणे परवड होऊ नये म्हणून त्यांनी १९२९ साली रत्नागिरीत शाळा बांधली. रत्नागिरीत त्यावेळी स्वा. सावरकर ब्रिटिशांच्या ‘नजरकैदेत’ होते.

त्यांना राजकारणात भाग घेता येत नव्हता. सावरकरांनी समाजकारण करायचं ठरवलं. त्यासाठी मदतीचा आणि पैशाचा हात भागोजी कीरांनी पुढे केला. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र आल्या. त्यांनी तिथल्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचं म्हणजे सावरकरांच्या कल्पनेतलं पतितपावन मंदिर भागोजी कीरांनी बांधून दिलं.

२२ फेब्रुवारी १९३१ ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुलं झालं. पतितांना पावन करणारं म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव ‘पतितपावन मंदिर’ असं ठेवलं. अस्पृश्यांसह सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असलेलं ते भारतातलं पहिलं मंदिर ठरलं. अशाप्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला.

शिवाजी पार्कचं सावरकर सदन कीरांनीच बांधलं. पैसे मात्र सावरकरांनी दिले

एकदा त्यांच्या लक्षात आलं की, दादरसारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही. त्यांनी काय केलं असेल ??? सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज केला ??? अजिबात नाही !!!

ती समाजकार्याची आजची पद्धत आहे. सामाजिक कार्याचा देखावा करून भूखंड लाटायचा. त्यावर दोन टक्के समाजसेवा करायची. उरलेल्या अठ्ठ्याण्णव टक्के भूखंडाचं श्रीखंड खायचं.

त्यांनी शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून विकत घेतली. त्यावर स्मशान उभारलं आणि मग त्याचं ‘लोकार्पण’ केलं.

दादरकरांची शेवटची यात्रा तिथे संपते.

साने गुरुजी, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, विजय मांजरेकर सारख्या अनेक नामवंतांची रक्षा त्या मातीत मिसळलीय. भागोजी कीर यांनी केलेले हे लोकाभिमुख कार्य आ काळाच्या खूप पुढे असणारे आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: