महेंद्र गायकवाड
नांदेड
जगभरातून सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यांच्या राहण्यासाठी गुरुद्वारात प्रशासनाने यात्री निवासांची सुविधा उपलब्ध केली आहे . परंतु येथे ठाण मांडून राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स. जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक परविंदरसिंघ पसरिचा यांच्याकडे केली आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेले सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात त्यांच्या राहण्यसाठी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने यात्री निवासांच्या माध्यमातून मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने पंजाब भवन यात्री निवास, एनआरआय यात्री निवास, अंगद जी यात्री निवास, एसजीपीसी यात्री निवास, ग्रंथ साहेब भवन, गुरुद्वारा परिसर, भाई दयासिंगजी यात्री निवास, बाबा मोनीजी यात्री निवास व रामदासजी यात्री निवासच्या माध्यमातून सुमारे 800 ते 1000 रूम उपलब्ध आहेत. परंतु येणाऱ्या भाविकांना यात्री निवासांमध्ये मागील चार ते पाच वर्षापासून ठाण मांडून राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे रूम उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत असल्याने भाविकांना खाजगी लॉज व हॉटेलचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे.
दीर्घ काळापासून ठाण मांडून राहिलेल्या कर्मचारी येथील यात्रि निवासांमध्ये बोगस नावाने बुकिंग करून रूम अडवूनन ठेवत असून आलेल्या नवीन भाविकांना रूम उपलब्ध नसल्याचे सांगून अडवणूक करीत असल्याचे नंबरदारर यांनी तक्रारीत नमूद केले आहे . येथील काही कर्मचाऱ्यांनी रूम उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गैरसोय करीत स्वतःच्या ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केल्या आहे त्यामुळे यांची चौकशी करून बदली करावी अशी मागणी नंबरदार यांची आहे.