आकोट – संजय आठवले
गांधीग्राम पूल नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची बिघडलेली घडी काही प्रमाणात नीट करण्याकरिता अकोला अकोट रेल्वे सुरू करण्याची मागणी वाढल्याने या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या हालचाली ही वाढल्या असल्याचे दिसत असतानाच नांदेडचे डीआरएम उपिंदरसिंग १८नोव्हें. रोजी आकोट येथे येत आहेत. अकोला आकोट रेल्वे मार्ग सुरू करणे संदर्भात ही अंतिम पाहणी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आकोट अकोला सडक मार्गावरील गांधीग्राम पूल नादुरुस्त झाल्याने सर्वच प्रकारची वाहतूक सर्वार्थाने बाधित झाली. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत करणे संदर्भात अन्य पर्यायांसह अकोला आकोट रेल्वेही सुरू करण्याची जोरदार आग्रही मागणी होत आहे. या रेल्वे मार्गाच्या सर्व चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. याखेरीज रेल्वे सुरक्षा विभागाचा अहवालही अनुकूल आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सुरू होण्यास काहीच अडकाठी नाही.
ही बाब ध्यानात घेऊनच रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे अंतर्गत असलेल्या विविध विभागांना आपले अहवाल मागविले होते. ते अहवाल दि. १५ नोव्हेंबर पर्यंत प्राप्त होणे अपेक्षित होते. तसे ते प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच हे अहवाल प्राप्त होण्याचे दरम्यान रेल्वे चालवून पुन्हा या मार्गाची चाचणीही घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड येथील डीआरएम उपिंदरसिंग हे आकोटात येत आहेत. दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता अकोला येथून त्यांचे आगमन होणार आहे. त्यांच्या येण्याचा मुख्य हेतू आकोट आणि अकोला येथील रेल्वे स्थानक आणि तेथे कार्यरत विविध विभागांची तपासणी करण्याचा आहे. रेल्वे स्थानकांसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची तथा कोविड संदर्भातील नियमांचे पालन होते किंवा नाही याची ते तपासणी करणार आहेत.
त्यानंतर २.३० वाजता ते आकोट येथून प्रस्थान करणार आहेत. त्याच कालावधीत ते अकोला आकोट रेल्वे सुरू करण्याबाबत आढावा घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या ह्या चाचणीनंतर अल्पावधीतच अकोला आकोट रेल्वे सुरू होण्याचे आकोटकरांचे स्वप्न पूर्णत्वास येण्याचे योग संभवत असल्याचे दिसत आहे.