वाशिम – विदर्भात सध्या हरभरा-गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र काढणीस आलेले पीक जंगली जनावरं फस्त करतात. काढून वाळत घातलेल्या व काढणीस आलेल्या पिकाची राखण करण्यासाठी शेतकरी रात्रभर जागल करण्यासाठी शेतात जातात. अनेकदा ह्या शेतकऱ्यांवर रानडुकरं, रोही, अस्वल असे प्राणी हल्ले करतात. असाच प्रकार वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील तऱ्हाळा शेतशिवारात घडला आहे.
तऱ्हाळा येथील 28 वर्षीय तरुण शेतकरी गणेश प्रकाश बाईस्कार हे शेतात जमा करून ठेवलेल्या हरभऱ्याची राखण करण्यासाठी काल रात्री गेले असता पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्यावर रान डुकरांने हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. गणेश याचे मोठे भाऊ मंगेश शेताच्या दुसऱ्या टोकावर जागल करत होते. त्यांना ५:३० वाजताच्या दरम्यान जाग आली आणि ते प्रान्तविधी करण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा काहीतरी आवाज येतोय म्हणून ते घटना स्थळी आलेत.
तेव्हा हि घटना उघडकीस आली. तेव्हा मंगेश ने गणेशला पाणी पाजले व दवाखान्यात नेण्याकरिता स्वतःच्या हाताने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. गणेश चे वजन जास्त असल्यामुळे उचलून घेऊन जाणे शक्य झाले नाही. तेव्हा गावातील नागरिकांना फोन करून ही माहिती दिली. तिथपर्यंत खूप उशीर झाला होता. हा हल्ला एव्हडा भीषण होता की गणेशच्या डोक्याची कवटी फुटली व रक्त भंभाळ झाले होते.
काही दिवसांवर आले होते लग्न
रान डुकरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गणेश यांचे काही दिवसांनी लग्न होणार होते. मात्र लग्नाच्या गडबडीत शेतातील कामे रेंगाळतील व येत्या काही दिवसात पावसाची शक्यता असल्याने काल गडबडीने त्यांनी हरभऱ्याची सोंगणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. काल सोंगणी नंतर राखण करण्यासाठी ते शेतात गेले होते. प्रकाश विठ्ठलराव बाईस्कार यांना पाच मुलं व एक मुलगी आहे. गणेश हा चवथ्या नंबर चा मुलगा होता. मुलाच्या लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न बघणाऱ्या बाईस्कार कटुंबाच्या डोळ्यात आता अश्रू उरले आहेत.