मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर
जगात अनेक धर्म आहेत. सर्वात वर माणुसकी हा धर्म आपण मानतो. पण ‘नाटकवाला’ हाही एक धर्म आहे आणि तो धर्म नाट्य क्षेत्रात अतिशय प्रेमाने, आदराने आणि कसोशीने पाळला जावा हेच खऱ्या नाटकवाल्याचं ब्रीद आहे! शेवटी धर्म म्हणजे आचरण. या क्षेत्रात एकमेकांचे पाय खेचणारे जसे आहेत, तसेच एकमेकांना मदत करणारेही आहेतच. याचा प्रत्यय नुकताच आला. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ गिरगाव येथे एका संस्थेच्या साठी दि. २० नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग ठरला होता; मात्र त्याच दिवशी अचानक नाटकातील मुख्य भूमिका असलेल्या अभिनेता सागर कारंडे याची तब्येत बिघडून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. हे सर्व घडलं तेव्हा साधारण २:३० वाजले होते आणि प्रयोग होता ४:३० वाजताचा!
प्रयोग संस्थेच्या साठी असल्याने आयोजकांना प्रेक्षकांना काय सांगावे ही चिंता लागलेली असताना अचानक सूत्रधार गोट्या सावंत यांनी फोनाफोनी करून ‘अभिजात’ संस्थेच्या “वासूची सासू” या नाटकाचा प्रयोग करूया म्हणून सांगितले. निर्मात्याला अचानक प्रयोगांसाठी मॅनेजमेंट करणं अवघड होणार होतं; परंतु तरीही आपण प्रयोग करू यावर गोट्या सावंत, अभिनेता अमोघ चंदन ठाम होते. नाटकातील मुख्य अभिनेत्री (पद्मश्री) नयना आपटे १२ दिवस मॉरिशस येथे होत्या आणि त्या योगायोगाने सकाळीच भारतात आल्या होत्या. अजून एक मुख्य अभिनेता (चला हवा येऊ द्या फेम) अंकुर वाढवे दुपारचं जेवत असताना त्याला फोन आला आणि तडक त्याने जेवण संपवून मीरा रोडवरून गिरगाव च्या दिशेने प्रवास सुरु केला. नाटकाचे नेपथ्य सुरेश सावंत यांनी अक्षरशः १० मिनिटात दादर गोडाऊन येथून भरून ताबडतोब रवाना केले.
नेमका त्याच दरम्यान मध्य रेल्वे वर जम्बो मेगाब्लॉक! नाटकातील मध्यवर्ती भूमिका असलेला (विक्रमार्जुन) आकाश भडसावळे एका तालमीसाठी नेरळ ते मुलुंड जात असताना ब्लॉक मधून मार्ग काढत काढत साहित्य संघात दाखल झाला. अभिनेता मयुरेश पंडित डोंबिवलीहुन निघाला. अमोघ चंदन आणि सुयश पुरोहित अभिनेता सागर कारंडेला हॉस्पिटलमध्ये बघायला चालले असताना त्यांनी गाडी संघाकडे वळवली. नाटकाचे लाईट्स आणि म्युझिक ऑपरेट करणाऱ्यांचे क्रमांक 4 वाजेपर्यंत लागत नव्हते, पण कळल्या कळल्या ‘प्रयोग आहे’ असं म्हणतात त्यांनी साहित्य संघाकडे धाव घेतली. मेकअप साठी आमच्या टीमपैकी कुणीही उपलब्ध नाही असं कळताच ते अरेंज करण्यासाठी सूत्रधार गोट्या सावंत यांनी कंबर कसली. काहीही करून प्रयोग करायचाच यासाठी आम्हा सगळ्या कलाकारांचे आणि संपूर्ण बॅक स्टेज टीमचे प्रयत्न सुरू होते. मात्र एक मुलगी आधीपासून कल्याण येथे कार्यक्रमात असल्याने तिला येणं शक्य नव्हतं. तेव्हा तिचे दोन प्रवेश करण्यासाठी ‘फॅमिली’ नाटकाची अभिनेत्री सायली आयत्या वेळी उभी राहिली.
सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला तो ‘वासूची सासू’च्या हिरोईन आणि अजून एक पात्र करणाऱ्या कलाकाराचा. दोघेही ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रवींद्र नाट्य मंदिर दादर येथे काम करत होते; तो स्लॉट होता 6 ते 7 दरम्यान! त्यांना तिथून येणं शक्य नव्हतं. तेव्हा सूत्रधार गोट्या सावंत यांनी आयोजक, परीक्षक, स्पर्धेची टीम यांच्याशी बोलून अभिनेत्री संजना पाटील आणि वल्लभ शिंदे यांना ताब्यात घेतलं. तोवर इथे गिरगावला ‘सासू’चा प्रयोग सुरू झाला होता. अगदी १२-१३ मिनिटात ट्रॅफिकमधूनही वाट काढत टॅक्सी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी ते साहित्य संघ मंदिर गिरगाव अशी आली आणि मग पहिल्या अंकातील दुसरा प्रवेश सादर झाला आणि पुढेही नव्यांना सांभाळून घेत, नाटकाची तालीम न करताही नाटक सुरळीत सुरू राहिलं. पुढे नाटक संपवायची पण घाई होती. मात्र हे सगळं दिव्य व्यवस्थित पार पडलं. ही खरं तर त्या रंगदेवतेची कृपाच म्हणायला हवी.
प्रेक्षकांना फक्त पडद्यापुढच्या करामती दिसत असतात. पण त्या दिवशी प्रयोग व्हावा म्हणून पडद्याआड राबणारे असंख्य हात कामी आले. प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे, व्यवस्थापक प्रशांत माणगावकर, आदित्य दरवेस, सुरेश सावंत, आमचे रंगभूषाकार, वेशभूषा संभाळणारे जयवंत सतोसकर, साहित्य संघाचे सर्व कर्मचारी, बॅक स्टेज सांभाळणारे शेखर कदम, व्यवस्थापक श्रीकांत तटकरे आणि आमचे बिग बॉस गोट्या सावंत या सगळ्यांचे हे एकत्रित श्रेय आहे. एक नाटकवाले दुसऱ्या नाटकवाल्याच्या मदतीला धावून आले आणि नाट्यधर्माला जागले याबद्दल ‘वासूची सासू’ नाटकाच्या टीमचे कौतुक आहे.