Dr. Shahana : देशात बरेच बदल झाले असतील पण हुंडा मागण्याची जुनी परंपरा अजुही सुरूच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये 26 वर्षीय डॉक्टर मुलीने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. हुंड्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. कुटुंबीय हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.
राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. शहाना यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी महिलेच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. शहाना तिची आई आणि दोन भावंडांसोबत राहत होती. आखाती देशात काम करणाऱ्या तिच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. ती डॉ. ईए रुवैस यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. रुवैस यांच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून 150 ग्रॅम सोने, 15 एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केल्याचा आरोप शहाना यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. स्थानिक वृत्तपत्रच्या वृत्तानुसार, जेव्हा डॉ. शहानाच्या कुटुंबीयांनी सांगितले की ते मागणी पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा तिच्या प्रियकराच्या कुटुंबाने लग्न रद्द केले.
यामुळे तरुणी डॉक्टर अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्या केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते – “प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत.”
या प्रकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या महिला व बालविकास विभागाला हुंडा मागणीच्या आरोपांबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगही या प्रकरणात लक्ष घालत आहे. समितीचे अध्यक्ष ए.ए. रशीद यांनी जिल्हाधिकारी, शहर पोलिस आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना १४ डिसेंबर रोजी आयोगासमोर हजर राहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पी सतीदेवी यांनी डॉ. शहाना यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली. हुंड्याच्या मागणीमुळे झालेल्या मानसिक त्रासाने तरुण डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले असेल, तर कठोर कारवाई करावी, असे सतीदेवी म्हणाल्या.