Sunday, December 22, 2024
Homeराज्यडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पीक वाण, शेतीपयोगी यंत्र - अवजारांसह पीक...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पीक वाण, शेतीपयोगी यंत्र – अवजारांसह पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता प्रदान..!

अकोला – संतोषकुमार गवई

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र व शेतकरी बांधवांसाठी पिकांचे अधिक उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारित वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे आणि एकूणच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशा कृषी तंत्रज्ञानात्मक शिफारसींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक ७ ते ९ जून, २०२४ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५२ व्या बैठकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या शास्त्रज्ञानी आपला दबदबा कायम ठेवत विविध तांत्रिक सत्रांमध्ये गटनिहाय संपन्न झालेल्या संशोधनात्मक सादरीकरणाचे निष्कर्ष व गुणवत्ता तसेच सखोल विचार मंथनातून पिकांचे सुधारित नवीन आशादायक वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उपयुक्त कृषी तंत्रज्ञान विषयक शिफारशींना अंतिम मान्यता प्राप्त करत शिक्कामोर्तब केले.

सदर महत्वपूर्ण बैठकीमध्ये राज्यातील एकूण चारही कृषी विद्यापीठे मिळून वीस पिक वाण, 8 यंत्रे व अवजारे तथा 250 उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानाना मंजुरी मिळाली असून यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 6 पीक वाणांसह 3 यंत्रे व अवजारे आणि 73 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफ़रशींचा समावेश आहॆ. सदर संशोधन याच हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पी डी के व्हीं संशोधित पीक वाण

हरभरा : सुपर जॅकी (एकेजी -1402)

वाणाचे गुणधर्म:
देशी हरभरा वाण पि.डी. के. व्ही. सुपर जाकी (ऐ.के.जी. १४०२) या वाणाने २०७३ कि/हे बियाणे उत्पादन नोंदविले असून या वाणाने तुल्यबळ वाण जाकी ९२१८ (१७१६ कि/हे) पेक्षा २०. ८० टक्के, तुल्यबळ वाण दिग्वीजय (१७३५ कि/हे) पेक्षा १९.४८ टक्के, तुल्यबळ वाण पि.डी.के. व्ही. कनक (१८६२ कि/हे) पेक्षा ११.३३ टक्के, तुल्यबळ वाण पि.डी. के. व्ही. कांचन (१८७९ कि/हे) पेक्षा १०.३२ टक्के, तुल्यबळ वाण फुले विक्रम (१९०४ कि/हे पेक्षा ७.५६ टक्के आणि बी.डी.एन. जी.-९-३ (१९३० कि/हे) पेक्षा ७.४० टक्के अधिक बियाणे उत्पादन नोंदविले आहे.

सदर वाण अर्ध ताठ वाढणारा असून यांत्रिक कापणीसाठी योग्य आहे तथा लवकर (९८ दिवसात) परिपक्व होणारा असून मर रोगा करिता प्रतिकारक ते मध्यम प्रतिकारकारक आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी परिपक्व होतो.

धान : पीडीकेव्ही साक्षी

वाणाचे गुणधर्म
उत्पादन : ४४ क्वि/हे
लवकर येणारा (१२० दिवस)
लांब बारीक दाण्याचा, खाण्यास उत्तम, ठेंगणा, न लोळणारा
उच्च पोषण युक्त (जस्त २५, लोह १० पीपीएम)
पानावरील करपा, ग्लूम डिस्क्लरेशन, खोडकिडींना साधारण प्रतिकारक.

  1. मोहरी : पीडीकेव्ही कार्तीक
    वाणाची गुणधर्म :
    उत्पादन : १५ क्वि/हे
    तेलाचे अधिक प्रमाण (४०.३२ टक्के) शेंगामध्ये बियांची संख्या जास्त,मावा आणी भुरी रोगाला स्पर्धाक्षम वाणांपेक्षा तुलनात्मक.
  2. कुटकी: पीडीकेव्ही तेजश्री
    वाणाची गुणधर्म
    उत्पादन : २२.६३ क्वि/हे
    मध्यम ते उशीरा कालावधी
    महाराष्ट्रातील खरीप हंगामाकरीता
    प्रमुख किड व रोगास सहनशील.
  3. ग्लॅडीओलस : पिडीकेव्ही सातपुडा पर्पल
    वाणाची गुणधर्म
    फुलदांड्याचे अधिक उत्पादन (२.७७ लाख फुलदांडे प्रति हे)
    प्रति झाड कंदाचे अधिक उत्पादन (२.५९), आकर्षक जांभळ्या पाकळ्या व त्यावर गडद निळसर जांभळ्या रंगाच्या पट्ट्या, लांब सरळ फुलदांडा (१०५.८० सें.मी.), फुलदांड्यावरील फुलांची अधिक संख्या (१५.५०), फुलदाणीतील अधिक टिकवण क्षमता (१०.३८ दिवस), मर रोगास मध्यम प्रतिकारक.
  4. करडई : पीडीकेव्ही व्हाईट
    वाणाची गुणधर्म
    उत्पादन : १६.९५ क्विं/हे
    तेलाचे अधिक प्रमाण (२८– ३३%)
    जाड व पांढऱ्या रंगाचा दाणा
    मध्यम ते उशीरा कालावधी (१३६ ते १४०दिवस)
    मावा कीडीस सहनशील
    अल्टररिया रोगास मध्यम प्रतिकारक.

पी डी के व्हीं संशोधित यंत्र व अवजारे

पंदेकृवि विकसित लहान ट्रॅक्टर चलित इंधन कांड्या तयार करण्यासाठी यंत्र

यंत्राची गुणधर्म
सोयाबीन काड व पऱ्हाटी या कृषी अवशेषापासून १५ मि.मी. आकाराचे इंधन कांड्या तयार करता येतात.
मशीनची क्षमता प्रति तास ५० कि.ग्रॅ. आहे.
कृषी अवशेष भरणे, त्याचे मिश्रण आणि इंधन कांड्या यंत्रणा चालीविनेसाठी छोटे ट्रॅक्टर (१८-२८ अश्व शक्ती) पुरेसे आहे.
इंधन कांड्याची घनता व मुल्य यामध्ये कृषी अवशेषच्या तुलनेत सुधारणा होते.
इंधन कांड्याचा उपयोग सुधारीत शेगड्यांमध्ये करता येतो.

  1. पटाशी नांगर सलग्नक रोटाव्हेटरच्या अधिक वापरामुळे तयार झालेला जमिनी खालील कडक थर फोडण्याकरिता
    पटाशी नांगराची खोली २३ ते ४५ सेमी पर्यंत ठेवता येते
    ५८ टक्के एकूण कामाच्या खर्चात बचत होते
    वेळेमध्ये एकूण कामाच्या ४६ टकके बचत होते.
  1. ट्रॅक्टर चलित पंदेकृवि हळद काढणी यंत्र
    यंत्राची गुणधर्म
    गादी वाफ्यावरील हळद काढण्यासाठी
    कार्यक्षमता ९८.५२ टक्के
    श्रम आणि वेळेची बचत
    मजबूत आणि टिकाऊ बांधणी
    वापरण्यासाठी सुलभ.
    यासंह एकूण 73 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना उपरोक्त संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात तथा संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांचे नेतृत्वात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम करीत शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी संकल्पना कृतीत आणण्यासाठी चे आपले योगदान अधोरेखित केले आहे.
Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: