सांगली प्रतिनिधी -ज्योती मोरे
नागपंचमी या सणाचे औचित्य साधून नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम शाळेत मुख्याध्यापक व सर्पमित्र म्हणून परिचित असलेले माननीय श्री.अधिकराव पवार यांचे सापांपासून भयभीत होऊ नका तर त्यांचे मित्र बना यावर आधारित व्याख्यान आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानामध्ये जगामध्ये असणाऱ्या सापांच्या विविध जाती , भारतामध्ये असणारे सापांचे विविध प्रकार , विषारी- बिनविषारी साप, सापांची रचना, त्यांचे खाद्य, भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान, माणसाला दंश केल्यानंतर साप किती प्रमाणात शरीरात विष सोडू शकतो, त्या विषाचा चा शरीरावर होणारा परिणाम, त्यावेळी केले जाणारे उपचार, प्रतिविष कशा पद्धतीने तयार केले जाते, सापांच्या विषाची किंमत , यासारखी विविध माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आली .
सापाचे शत्रू कोण साप कुठे असतात? साप मारले किंवा आपल्या हातून मेला तर साप डूक धरून आपणास शोधतो का ?नवे साप कसे जन्माला येतात? सगळे साप विषारी असतात का? विषारी साप चावल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? साप दूध पितो का? सापाच्या तोंडाला फेस कशामुळे येतो? साप श्वासो श्वास करतात का? यासारख्या विद्यार्थ्यांच्या विविध शंका कुशंकांचे समाधान शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून करण्यात आले.
प्रशालेचे विद्यार्थी ,पालक व शिक्षक यांचेकडून आलेल्या विविध प्रश्नांना ,स्वअनुभवातून समर्पक अशी उत्तरे देण्यात आली. सर्पमित्र श्री पवार सर यांना घोणस दंश झाला असताना त्यांनी त्यावर कशाप्रकारे मात केली हा स्व अनुभव सांगितला. या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचे मानसिक संतुलन राखणे आणि वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे असे सांगितले.
त्याचबरोबर नाग व सापांच्या विषयी लोकांच्या मनात असलेली भीती व शंकांचे निरसन देखील करण्यात आले. स्वतःला सर्पदंश झालेला असताना सुद्धा अशा संकटातून सुखरूप बाहेर पडून , इतरांना सापांचे मित्र बना, त्यांना मारू नका, निसर्गाशी जवळीक साधा, प्राणीमात्रावर दया करा, असा बहुमोल संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये साप व नागांच्या माहितीचा स्लाईड शो तयार करण्यासाठी शाळेतील लिपिक श्री रोहन पाटोळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ विनिता रावळ यांनी केले.