Divya Bharti : दिव्या भारतीचा आज वाढदिवस असल्याने तिच्या स्मृतींना उजाळा म्हणून अभिनेत्रीशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. दिव्या भारती ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्याने अल्पावधीतच इंडस्ट्रीत मोठ नाव केलं होत. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच तिची गणना टॉप अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. दिव्या आज भलेही आपल्यासोबत नसेल, पण तरीही ती आणि तिचा दमदार अभिनय चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. दिव्याच्या गोंडसपणावर आणि तिच्या नखरेबाज स्वभावावर प्रेक्षक फिदा व्हायचे.
दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून केले. तिने लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते, जे तिने पूर्णही केले. तिला अभिनयाचं इतकं वेड होतं की तिने त्यासाठी अभ्यासही सोडला. वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. यासाठी दिव्या भारतीने इयता नवी मध्येच शिक्षण सोडले.
1990 मध्ये, दिव्या भारतीने डी रामनायडू यांच्या ‘बोबिली राजा’ या तेलगू चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. हा चित्रपट सुपरहिट ठरला, ज्याने दिव्याला साउथ इंडस्ट्रीत ‘द लेडी ऑफ सुपरस्टार’ बनवले. यानंतर अभिनेत्रीने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. दक्षिणेत तीची लोकप्रियता गगनाला भिडू लागली. त्यानंतर, तिने बॉलिवूडकडे धाव घेतली, जिथे तिने आपली क्षमता सिद्ध केली.
अभिनेत्रीने 1992 मध्ये ‘विश्वात्मा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेत्रीने सनी देओल, अमरीश पुरी, चंकी पांडे आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटातून ती रातोरात स्टार बनली. यानंतर ती ‘दिल का क्या कसूर’ चित्रपटात दिसली. हा चित्रपट पडद्यावर फ्लॉप ठरला असला तरी अभिनेत्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच वर्षी रिलीज झालेल्या डेविड धवनच्या ‘शोला और शबनम’ या चित्रपटात दिव्याने गोविंदासोबत काम केले होते. ‘शोला और शबनम’ हा त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने दिव्याच्या करिअरमध्ये यशाची चाके लावली होती. त्याच वर्षी दिव्याने ‘दीवाना’, ‘जान से प्यारा’, ‘दिल आशना है’, ‘बलवान’, ‘दिल ही तो है’, ‘गीत’ आणि ‘दुश्मन जमाना’ असे अनेक चित्रपट केले.
दिव्या भारतीने अगदी लहान वयातच सुपरस्टारच्या स्वप्नातल्या सर्व गोष्टी साध्य केल्या होत्या. दिवसेंदिवस यश दिव्याच्या पायाचे चुंबन घेत होते, पण त्याच दरम्यान एक अशी बातमी आली, ज्याने सर्व चाहत्यांची हादरून गेली. ती म्हणजे दिव्याच्या मृत्यूची बातमी आली. दिव्याने वयाच्या १८ व्या वर्षी साजिद नाडियादवालासोबत गुप्त लग्न केले होते. साजिदशी लग्न करण्यापूर्वी तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून सना ठेवल्याचे सांगितले जाते. 1992 मध्ये, वयाच्या 19 व्या वर्षी दिव्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जे सुपरहिट ठरले. हे वर्ष अभिनेत्रीसाठी खूप चांगले गेले, पण पुढच्याच वर्षी म्हणजे 5 एप्रिल 1993 रोजी तिनेही जगाचा निरोप घेतला.