आकोट – संजय आठवले.
श्री शिवाजी महाविद्यालय, आकोट येथे नुकताच महसूल व गृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पोलिस पाटील मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव होते. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.
पुढील काळात एकापाठोपाठ साजरे होणारे पोळा, गणेशोत्सव,दुर्गादेवी, ईद इत्यादी सणोत्सव तसेच हाकेच्या अंतरावर आलेल्या निवडणूका ह्या शांतता व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्याकरिता मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय येथे विभागीय पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. ह्याप्रसंगी महसूल व गृह विभागाची भुमिका व जबाबदारींची सविस्तर माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटनपर भाषणातून विशद केली.
ॲड. गजानन पुंडकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून केलेल्या विनंतीला उत्तर देताना घूगे यांनी सांगितले की, ‘पोलिस पाटलांना वारसाचे दाखले देताना काही अडचणी येतात. अकोला जिल्ह्यातील अनेक गावात दहा ते अकरा वर्षापासून पोलिस पाटील यांची पदे रिक्त आहेत. शासनाकडे पाठपुरावा करूनही ही पदे भरण्यात आलेली नाहीत. अनेक ठिकाणी एकाच पोलिस पाटलावर तिन ते चार गावांचा पदभार आहे. त्यामुळे इतर गावातील नागरिकांना दाखले मिळण्यासाठी विलंब व त्रास होतो, ही समस्या व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण तत्परतेने प्रयत्न करू.
मेळाव्याचे अध्यक्ष तथा आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनीही उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. मेळाव्याला सहायक पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, एस.डी.पी.ओ. रितू खोखर, तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, आकोट शहर पो. नि. तपन कोल्हे, ग्रामीण पो.नि.संजय खंदाडे, दहिहांडा पो. नि. सेवानंद वानखडे, हिवरखेड पो. नि. गोविंद पांडव, प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भगवंतराव कराळे, आकोट तालुका, अरविंद अवताळे, तेल्हारा तालुका, सौ. दीपा अनिल वाघोळे, अडगाव, प्रा. शिल्पा विनायक सपकाळ, नेटसेट उत्तीर्ण, सावरा, शंकरराव लोखंडे, संचालक, कृ.ऊ. बा. समिती, आचार्य पदवी प्राप्त खंडाळा पोलीस पाटील अरूण तायडे, या पोलिस पाटलांचा “ग्रामरत्न पोलिस सेवा पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. तसेच दोन्ही तालुक्यातील आजी माजी पोलिस पाटील यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल कुलट यांनी केले. कार्यक्रमास दोन्ही विभागातील महिला व पुरुष पोलिस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गणेशराव पाथ्रीकर, नंदकीशोर गावंडे, अमर शेगोकार, अर्चना योगेश ठाकुर, सुनील अवारे, प्रमोदराव नहाटे, सुनील झामरे इत्यादी पोलिस पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.