Saturday, November 16, 2024
Homeराज्यदिविजा वृद्धाश्रमात अवतरले प्रति पंढरपूर : वृद्धाश्रमातून आजी आजोबांनी काढली दिंडी...

दिविजा वृद्धाश्रमात अवतरले प्रति पंढरपूर : वृद्धाश्रमातून आजी आजोबांनी काढली दिंडी…

गणेश तळेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी मोठ्या उत्साहाने विठ्ठलाची दिंडी काढून साजरी केली. यावेळी आजी आजोबांनी केलेली विठ्ठल रखुमाई, विविध संत आणि वारकरी यांच्या पेहरावामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना त्यांच्या शारीरिक व्याधी व वाढत्या वयोमानामुळे पंढरपूरला घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी आपल्या सर्व कर्मचार्यांच्या मदतीने अवघा पंढरपुरच दिविजा वृद्धाश्रमात अवतरला. आजी आजोबांना सुखद वारीचा आनंद घेता यावा यासाठी कर्मचार्यांनी आजी आजोबांना सकाळपासून वारकरी वेशभूषांचा पेहराव नटवण्यास सुरुवात केली. आश्रमातील आजींना नऊवारी साड्या तर आजोबांना वारकर्यांचे धोतर व सदरे लेंगे टोप्या व गळ्यात तुळशी माळा व कपाळी कस्तुरी टिळा लाऊन नटवण्यात आले. आजी आजोबातील एका आजोबांना विठ्ठलाचा पेहराव व एका आजीला रुक्मिणीचा पेहराव नेसवण्यात आला.

तसेच आश्रमातील आजोबा कीर्तिराज बागवे यांना संत नामदेव यांचा पेहराव केला. विठ्ठल रुक्मिणी यांचा अभिषेक करून पुजा अर्चा सर्व आजी आजोबांनी व कर्मचार्यांनी मिळून केली. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर वृद्धाश्रमातील महिला कर्मचार्यांनी सामुहिक भजन केले व माऊली माऊली यां गाण्यावर टाळ्यांच्या गजरात नृत्य सादर केले. आश्रमातील कर्मचारी समीर मिठबावकर याने त्याच्या सुस्वर आवाजात अभंग सादर केले. आजी-आजोबांनी उस्फुर्तपणे त्यांच्या सोबत नाचण्याचा आनंद अनुभवला. त्यानंतर वारीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

फुगडी, रिंगण, लंगडी नृत्य आणि ढोल ताश्यांच्या गजरात अवघा दिविजा वृद्धाश्रम दुमदुमला. वृद्धाश्रमातील वातावरण पंढरपुरमय होऊन गेले. ढोल आणि लेझीमच्या तालावर आश्रमातून दिंडी निघाली. आजींच्या डोक्यावर तुळशी, आजोबांच्या हातात झांजा तसेच लेझीम नाचत गाजत विठूरायाची दिंडी दिविजा वृद्धाश्रमातून निघाली. यादरम्यान जणू काही ज्ञानोबा माउली विठूरायाच्या भेटीस निघाली अशा प्रकारचे दृश्य आश्रम परिसरात पहावयास मिळाले. आजी आजोबांच्या उत्साहात असलदे व कोळोशी ग्रामस्थ सहभागी झाले. असा हा अनोखा दिंडी सोहळा व आषाढीचा उत्साह दिविजा वृद्धाश्रमात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा केला गेला.

दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी या कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितले कि, कौटुंबिक प्रवाहातून आजी आजोबा बाहेर निघाले आहेत. आयुष्याच्या सांजवेळेत कौटुंबिक कलहातून बाहेर पडून दिविजा वृद्धाश्रमात आपले नविन कौटुंबिक जीवन उत्साहात आनंदात जगत आहेत. पंढरपुरला जाण्याची ओढ लागली आहे. परंतु शारीरिक व्याधी व वाढत्या वयोमानामुळे पंढरपुरास जाणे शक्य होत नाही. अशा या आजी आजोबांना विठ्ठल भेट व्हावी व दिंडीचा आनंद लुटण्यास मिळावा या उद्देशाने आश्रमातच पंढरपूरचा देखावा उभा केला आहे. पंढरपुरचा आनंद वृद्धाश्रमातच घेता यावा यासाठी या दिंडीचे आयोजन केले गेले.

या कार्यक्रमात दिविजा वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी वर्ग व संचालक संदेश शेट्ये, श्रीम संध्या गायकवाड, सौ. अमृता थळी, असलदे व कोळोशी ग्रामस्थ, श्री व सौ उज्वला लोके, सौ सुखदा देवरुखकर आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: