सांगली – ज्योती मोरे.
आरोग्यासाठी तृणधान्ये आहारात हितकारक आणि महत्त्वाची असून तृणधान्य वापराबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना शिंदे, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे, विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूर येथील प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार, नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे योगेश बन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे रामकृष्ण पटवर्धन व महाविद्यालयाचे प्राध्यापक राजकुमार पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आमदार श्री. गाडगीळ म्हणाले, आहारात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र फास्ट फूड मुळे आहारात तृणधान्याचे प्रमाण कमी झाले आहे. तृणधान्यांचा आहारात नेहमी वापर करून रोग प्रतिकार शक्ती वाढवू, असे आवाहन त्यांनी केले. तृणधान्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी कृषी विभागाबरोबरच सर्वच विभागानी प्रयत्न करावेत, असे सांगून श्री, गाडगीळ म्हणाले तृणधान्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले याचे आपणास समाधान वाटते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, फास्ट फूडच्या वापरामुळे आहारात तृणधान्याचा वापर कमी झाला आहे. तृणधान्याचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2023 वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तृणधान्यामुळे आरोग्य चांगले होऊन प्रतिकारशक्ती वाढते यामुळे शालेय पोषण आहारामध्ये देखील तृणधान्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्राध्यापक राजकुमार पाटील म्हणाले, निरोगी आयुष्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे. तृणधान्य सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते यामुळे मानवी आहारात तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जावेत, असे श्री. पाटील म्हणाले.
पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी आमदार श्री. गाडगीळ यांनी तृणधान्य पासून बनवलेल्या विविध पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली. तदनंतर त्यांनी रांगोळी प्रदर्शनाचीही पाहणी केली.