अकोला – संतोषकुमार गवई
गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे भेट देऊन गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील दिव्यांग मतदार गोवर्धन जानराव खांडेकर यांनी आज घरी बसून आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोला लोकसभा मतदार संघातील 726 दिव्यांग व 85 वर्षापुढील 1 हजार 632 मतदार अशा एकूण 2 हजार 358 मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 हजार 304 मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.
गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथ के नियुक्त करण्यात आली आहे. ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.