Saturday, December 21, 2024
Homeराज्यलोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन 'इलेक्शन मोडवर…राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने दायित्व द्यावे…विभागाने...

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन ‘इलेक्शन मोडवर…राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने दायित्व द्यावे…विभागाने मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

( गोंदिया ) आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढणे, निवडणुकांमध्ये अधिकाधिक पारदर्शिता, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, गतिशील कामे यासोबतच राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व पूर्ण करावे. जिल्ह्यात निवडणुकीच्या कामाची सुरुवात झाली आहे .असे समजून सतर्क असावे, अशी सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आज आयोजित बैठकीत केली.

भारत निवडणूक आयोगाकडून योग्य वेळी निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनाने आजपासूनच इलेक्शन मोडमध्ये येऊन कामाला सुरुवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसोबत अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या विविध विषयाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून आजच्या बैठकीत प्रत्येक नोडल अधिकाऱ्याला त्यांच्या कामाचा तपशील समजावून सांगण्यात आला. आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, निवडणूक साहित्य व्यवस्थापन, परिवहन व्यवस्थापन, संगणकीय कार्य व सायबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक खर्च, पोस्टल बॅलेट, माध्यम व पेड न्यूज, कम्युनिकेशन प्लान, मतदार यादी, निवडणूक निरीक्षक यांचे नोडल अधिकारी, दिव्यांग मतदार नोडल अधिकारी, सुरक्षा अधिकारी व्यवस्था, मतदार हेल्पलाईन, तक्रार निवारण, मतदार जनजागृती आणि ईव्हीएम व्यवस्थापन असे निवडणूक संबधी कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी समजून घेऊन ती योग्यरित्या पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.

निवडणूक काळात नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुका संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत विभागवार आढावा घेतला. निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या त्या विभागाची असणार आहे. ज्या विभागाकडून मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही त्यांनी तात्काळ मनुष्यबळ कळविण्याचे स्पष्ट करण्यात आले.

निवडणुकीच्या वेळेस नेमणुकांमध्ये बदल करणे, जागा बदलून मागणे, दिलेल्या जागेवर काम करण्यास असमर्थता दर्शविणे, आरोग्याचे वेगवेगळे कारण सांगणे, अशा प्रकारचे अनेक अर्ज कर्मचाऱ्यांकडून येत असतात. मात्र यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. निवडणुकीचे कार्य हे राष्ट्रीय कार्य असून त्याकडे तेवढ्याच सकारात्मकरित्या कर्मचाऱ्यांनी बघावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदार जागृतीच्या संदर्भातील उपक्रमाचे प्रमुख यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घोषित करण्यात आले, त्यांना सर्व विभागाने मदत करावी. यावर्षी जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुकांमध्ये विक्रमी मतदान व्हावे व युवकांचे मतदान सर्वात अधिक असावे याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांना जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यामध्ये गती आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. निवडणुकांमध्ये मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

यासाठी युवकांनी पुढे यावे व आपल्या आजुबाजूच्या परिसरातील ज्या लोकांनी मतदार म्हणून नोंदणी केली नसेल किंवा नावे मतदार यादीमध्ये आली नसेल किंवा मृत झालेल्या नागरिकांची नावे कमी करायची असेल यासाठी निवडणूक विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येक शिक्षित नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: