रामटेक – राजू कापसे
मिशन एज्यूकेशन कार्यक्रमाअंतर्गत मानव सेवा समितीद्वारे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सिल्लारी येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मानव धर्माचे प्रणेते सदगुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या ७३ व्या जन्मदिनाच्या अनुषंगाने समितीद्वारे सदर उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील सिल्लारी आणि पिपरिया या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल. पेन, रबर, पट्टी आदींसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मानव सेवा समितीच्या पूज्य महात्मा हरीशा बाईजी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.
यावेळी सोमाक्षी बाईजी, प्रांत संयोजक वसंत बारई आणि मिशन एज्युकेशनचे स्वयंसेवक रजनी सोनटक्के, सतीश सोनटक्के आदी उपस्थित होते. मानव सेवा समितीचे कार्य प्रशंसनीय, सेवाभावी आणि सामाजिक असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी यावेळी म्हटले आणि समितीचे आभार मानले.