आकोट – संजय आठवले
अख्ख्या भारतातील लहान मोठ्या पक्षांना एकसंध करण्याची कवायत काँग्रेस मधून होत असताना अकोला जिल्ह्यात मात्र काँग्रेसमध्ये असंतोष ऊफाळून आला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीला कंटाळून जिल्ह्याच्या सर्व तालुका अध्यक्षांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी वर्तमान जिल्हाध्यक्षांविरोधात मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
त्याकरिता या सर्व धूरीणांनी आकोट शहरात एक बैठक घेऊन जिल्हाध्यक्षांविरोधातील या मोहिमेचे सारथ्य आकोट तालुक्यातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे हाती सोपविले आहे. त्यांचे मार्फत थेट काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पर्यंत हे प्रकरण नेण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे.
देशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मजबुतीकरण होत असतानाच अकोला जिल्ह्यात मात्र वर्तमान जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांचे वर्तनावर जिल्ह्यातील काँग्रेस नेते खफा झाले आहेत. त्यांनी पक्षांतर्गत उठापटक सुरू केली आहे. तसे पाहू गेले तर, अमानकरांचे नियुक्ती पासूनच अनेक काँग्रेस नेते रुष्ट झालेले होते.
त्यामुळेच अमानकरांनी बनविलेली जिल्हा कार्यकारणीही दोनदा वादात सापडली होती. आता काँग्रेस पक्षाचे वतीने युद्ध स्तरावर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने तालुका व शहर अध्यक्षांना अनेक महत्त्वपूर्ण कामे करावी लागत आहेत.
त्यामुळे जिल्हाध्यक्षांना तालुका व शहर अध्यक्षांसोबतच त्या त्या तालुक्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. तसे केल्यावर सर्वसंमतीने नियोजित कार्य पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र अनेक बाबींमध्ये या लोकांना जिल्हाध्यक्षांमार्फत विश्वासात घेतले जात नसल्याची धुसफुस वाढू लागली आहे.
त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणुका अगदी उंबरठ्यावर आल्या आहेत. या उपक्रमांच्या निमित्त्याने ह्या निवडणुकांचीही तयारी करण्याचा पक्षीय मानस आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये उमेदवारीकरिता इच्छुक नेते आपल्या मतदारसंघात काँग्रेसचे उपक्रम राबविण्यास उत्सुक आहेत.
अशा स्थितीत संबंधित मतदार संघातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्ष अमानकर हे आपलाच अजेंडा चालवीत असल्याची या नेत्यांची धारणा झालेली आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच कार्यक्रमांचे नियोजन करून त्या मार्फत जिल्हाभरात स्वतःची फळी तयार करीत असल्याची कुजबूज होत आहे.
जिल्हाध्यक्षांच्या ह्या वर्तनाने ते अकोला लोकसभा उमेदवारी गृहीत धरून काम करीत असल्याची चर्चा होत आहे. सोबतच हा डाव फसला तर जिल्ह्यातील कोणत्याही एका विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्याचाही त्यांचा मानस असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे लोकसभा उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी नेते प्रशांत गावंडे हे सुद्धा भारत जोडो अभियानाचे आडून आपली स्वतंत्र फळी उभी करीत असल्याचा कयास लावला जात आहे. तर तिसरीकडे डॉक्टर अभय पाटील हे व्यक्तिगत संबंधांवर जोर देवून अकोला लोकसभा निवडणुकीकरिता दावेदारी प्रस्तुत करीत आहेत.
त्यामुळे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर, शेतकरी नेते प्रशांत गावंडे आणि डॉक्टर अभय पाटील या काँग्रेसमध्ये नवख्या असलेल्या नेत्यांच्या या हालचालीमुळे पक्षातील जुने, जाणते, मुरब्बी नेते अस्वस्थ झालेले आहेत. याच नेत्यांच्या शिफारशीवरून तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सर्व अध्यक्षांचा साहजिकच आपल्या नेत्यांकडे ओढा आहे. म्हणूनच नाराज नेत्यांसोबतच स्वाभाविकपणे हे सारे अध्यक्षही असंतोषाच्या नावेत स्वार झालेले आहेत.
त्यामुळे ‘ज्योतसे ज्योत जलाते चलो’ या न्यायाने या सर्व असंतुष्टांनी आपली मोट बांधली आहे. त्यातूनच या सर्व लोकांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना या मोहिमेचे धुरीणत्व स्वीकारण्याची विनंती केली. त्या विनंतीवरून या सर्व लोकांची मते जाणून घेण्याकरिता गत २९ ऑगस्ट रोजी आकोट येथे जेवणावळीसह बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला जिल्ह्यातील अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापुर, मुर्तीजापुर, पातुर व बार्शीटाकळी या तालुका व शहर अध्यक्षांसह वरिष्ठ काँग्रेस नेते बाबाराव विखे, सुनील धाबेकर, बबनराव चौधरी, ॲडवोकेट नातीकोद्दीन खतीब, डॉक्टर सुभाष कोरपे, महेश गणगणे, संजय बोडखे यांनी आपल्या विश्वासू लोकांसह हजेरी लावली होती.
याप्रसंगी व्यक्त करण्यात आलेल्या मनोगतात वर्तमान जिल्हाध्यक्ष कुणालाच विश्वासात घेत नसल्याचा मुद्दा प्रकर्षाने ऐरणीवर आला. त्यानंतर या साऱ्या प्रकाराची तक्रार उच्चस्तरावर अर्थात अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पर्यंत नेण्याचा मुद्दा चर्चिला गेला. आणि काँग्रेसचे अकोला लोकसभा उमेदवार म्हणून मागील निवडणूक लढविलेल्या हिदायत पटेल यांनी ही मोहीम फत्ते करावी असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार पटेलांनी या मोहिमेची सूत्रे स्वीकारलेली आहेत. परंतु असंतुष्टांच्या बैठकींचा सपाटा येथेच थांबणार नसून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर ह्या बैठका घेण्याचेही सर्वानुमते ठरविण्यात आले.
येत्या चार-दोन दिवसात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मुंबई मुक्कामी येणार आहेत. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांचे भेटीपूर्वी ह्या प्रभारींच्या कानी हे गार्हाणे घालण्याची योजना बनविण्यात आली आहे. अखिल भारतीय नेते पक्षाच्या अस्तित्वाकरिता निकराचा लढा लढण्यात गुंतलेले आहेत.
त्यामुळे एका जिल्ह्यातील असा क्षुल्लक वाद त्यांचे समक्ष नेणे आताच संयुक्तिक होणार नसल्याने हे गाऱ्हाणे तूर्तास राज्य प्रभारींचे कानी घालण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष अमानकरांना तंबी देऊन सार्यांना घेऊन चालण्याचा आदेश राज्य प्रभारींकडून मिळण्याचीच अधिक शक्यता वाटत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस असंतुष्टांचे हे “घोंगावणारे वादळ” देश आणि राज्यस्तरावर क्षणोक्षणी बदलणाऱ्या राजकीय घटनाक्रमांमुळे “पेल्यातील वादळ” ठरण्याची शक्यता दिसत आहे. त्यातच काहीच दिवसांपूर्वी वंचित सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना या पक्षाशी त्यांची दिलजमाई झालेली आहे. ती कायम राहणार असल्याचे सुतोवाच अनेकदा दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेकदा केले आहे. त्यामुळे आंबेडकर आज ना उद्या महाविकास आघाडीचे घटक होणार हे उघड गुपित आहे.
अशा परिस्थितीत कालच नगर येथील जाहीर सभेत “आपण काँग्रेसशी जुळवून घेण्यास आणि महाविकास आघाडीचा घटक होण्यास” उत्सुक असल्याचे बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अकोला लोकसभा मतदारसंघ बाळासाहेबच लढविणार यावर आजच शिक्कामोर्तब झाले आहे.
त्यातच अमरावती काँग्रेसने “अमरावती आम्हाला द्या आणि अकोला तुम्ही ठेवा” असा सांगावा उद्धव ठाकरे यांना धाडला आहे. तसे झाले तरी ठाकरे हा मतदारसंघ बाळासाहेबांकरिताच सोडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेवण्यात काहीच तथ्य राहत नाही.
लोकसभा मतदारसंघाची अशी तजवीज झाल्यानंतर प्रश्न उरतो जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा. जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहू जाता जिल्ह्यातील विधानसभेचे ५ मतदारसंघ काँग्रेस, सेना आणि वंचित यांच्यातच वाटले जाण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात विधानसभा लढविण्याएवढे राष्ट्रवादीचे बळ नाही.
परंतु राष्ट्रवादी वगळली तरी ह्या वाटणीत बराच कस लागणार आहे. परिणामी कोणता मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. या वाटणीमुळे अनेकांना आपल्या इच्छा जागीच दाबून ठेवाव्या लागणार आहेत.
अशी परिस्थिती होणार असल्याने आणि घटनाक्रम अतिशय जलद गतीने बदलत जात असल्याने काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि असंतुष्ट नेते यांना एकमेकांशी मिळते जुळते घेणे, एकमेकांना विश्वासात घेणे आणि एकमेकांचा सन्मान राखणे असा आपसी समझौता करणेच अधिक ईष्ट ठरणार आहे.
परंतु शेवटी राजकारण हे राजकारण आहे. त्यात केव्हा काय होईल याचा वेध घेणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे अकोला जिल्हा काँग्रेस मधील हा वाद कुठल्या थराला जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे.